नाशिक – शहरात मास्क न घालणाऱ्या व्यक्तींना थेट ५०० रुपये दंड करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून महासभेत तब्बल सहा तास वादळी चर्चा झाली. शहरात कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरित्या वाढत आहे. जवळपास एक हजार रुग्ण दररोज नव्याने बाधित होत आहेत. मास्क न वापरल्याने कोरोनाचा फैलाव होत असल्याने महापालिकेने पोलिसांच्या मदतीने मास्क न वापरणाऱ्यांना ५०० रुपये दंड करावा, असे आदेश महापौर सतीश कुलकर्णी यांनी महासभेत दिले.
शहरातील कोरोनाच्या संकटावर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (१५ सप्टेंबर) ऑनलाईन महासभा घेण्यात आली. शहरात अँटीजेन टेस्ट वाढविणे, प्लाझ्मा दान पद्धतीवर भर देणे, आरोग्य सेवेतील रिक्त पदे भरणे यासह अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.