मालेगाव – येथील रुग्णालयांना धुळ्यातील ठेकेदाराकडून होणारा ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठा बंद करण्यात आला आहे. त्यातच सिलेंडरची संख्या कमी असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. प्रशासनाने २०० अतिरिक्त सिलेंडर तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांनी केली.
येथील रुग्णालयांना धुळे येथील ठेकेदाराकडून सहा महिन्यांपासून ऑक्सिजन सिलेंडर पुरविली जात होते. हा ठेकेदार २४ तास सेवा देत होता. तसेच ने -आण वाहतूक खर्च व सिलेंडर भरणे, उतरविणे हेदेखील ठेकेदाराची माणसे करीत होती. महापालिकेचा तसा करार झाला होता. संबंधित ठेकेदाराला धुळे जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजन सिलेंडर पुरविण्याचे आदेश दिल्याने त्याने मालेगाव महापालिकेस पुरवठा करण्यास असमर्थता दर्शविली. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या सूचनेनुसार नाशिकहून येथे ऑक्सिजन सिलेंडर पुरविले जात आहे.