मालेगाव :येथील महापालिकेचा २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला महापालिकेच्या ऑनलाईन महासभेत बहुमताने मंजूरी देण्यात आली. स्थायी समितीने सुचविलेल्या २५ कोटींच्या वाढीसह तसेच महापौरांना फेरफार करण्याचे अधिकार देत ४५४.२८ कोटीच्या अंदाजपत्रकाला मंगळवारी (दि.३०) बहुमताने मंजुरी देण्यात आली.
येथील सभागृहात दुपारी ४ वाजता घेण्यात आलेली सभा महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपहापौर निलेश आहेर, स्थायी समिती सभापती राजाराम जाधव, उपायुक्त नितीन कापडणीस, रोहिदास दोरकुळकर, नगरसचिव शाम बुरकुल, लेखाधिकारी कमरुद्दीन शेख उपस्थित होते.
२०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता महापालिका प्रशासनाने ४२८.६० कोटींचे अंदाजपत्रक स्थायीला सादर केले होते. या अंदाजपत्रकात स्थायी समितीने २५.६८ कोटीची वाढ सुचवत ४५४.२८ कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांनी महासभेपुढे सादर केले. त्यावर व्यापक चर्चा झाली. यावेळी महागटबंधन आघाडीचे मुश्तकिम डीग्निटी यांनी अंदाजपत्रकावर चर्चेसाठी तीन दिवसांची मागणी केली. तर एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालिद परवेज यांनी देखील अंदाज पत्रकावर चर्चा व्हावी अशी मागणी लावून धरली. दरम्यान महापौर ताहेरा शेख यांनी नगरसेवक रशीद शेख यांच्या सूचनेनुसार अंदाज पत्रकावर मतदान प्रक्रिया राबवून सदर अंदाजपत्रकाला मंजुरी दिली. यावेळी हात उंचावून घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत उपस्थित ६८ सदस्यांपैकी ४८ सदस्यांनी सूचनेच्या म्हणजेच अंदाज पत्रकाच्या मंजुरीसाठी मतदान केले. तर १८ सदस्यांनी उपसूचना म्हणजे चर्चेसाठी तीन दिवसांची मुदतीच्या बाजूने मतदान केले. उर्वरित एम आय एमच्या दोघा नगरसेवकांनी तटस्थ भूमिका घेतली. यानंतर महासभेत अंदाजपत्रकाला बहुमताने मंजूरी देण्यात आली.