मालेगाव – विराणे येथील माळमाथा पाणीपुरवठा योजना धरणात अजंग येथील राहिवाशी असलेल्या दोन्ही सख्या भावांचा पाण्यात पडून जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटना बुधवारी (दि.२३) दुपारच्या सुमारास घडली.
अजंग येथील हर्षल देविदास जाधव (२१) व रीतेश देवीदास जाधव (१८) हे दोन्ही भाऊ दुचाकीनेे निमशेवडी येथे लग्नाला गेले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घरी परत येत असताना रस्त्यावरील विराणे येथील माळमाथा पाणीपुरवठा योजना धरणाजवळ सेल्फी काढण्यासाठी थांबले होते. त्यावेळी किनाऱ्यावर सेल्फी काढत असताना धरणाच्या काठावरील उतारावरून लहान भाऊ रितेश याचा पाय घसरल्याने तो धरणात बुडला. यावेळी त्याला वाचवण्यासाठी मोठा भाऊ हर्षलने प्रयत्न केले. परंतु दोघांना पोहता येत नसल्याने ते धरणात बुडाले. दरम्यान त्यांचा चुलत भाऊ भावेश जाधव मागून येत असतांना त्याचे लक्ष दुचाकीकडे गेल्याने हा प्रकार लक्षात आला.
यावेळी भावेश याने आरडा ओरड केली. त्यावेळी परिसरात असलेल्या ग्रामस्थांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी सरपंच नंदकुमार सोनवणे यांना फोन केला. यावेळी सोनवणे यांनी धाव घेत मदत केली. यावेळी पिंटू माळी यांच्यासह पाच ते सहा तरूणांनी पाण्यात उडी मारून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतू त्यांना वाचवण्यात यश आले नाही. या दोघा भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात येऊन शवविच्छेदनसाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. हर्षल हा नाशिक येथे इंजिनिअरिंगच्या दुस-या वर्षाला तर लहान दिनेश हा मालेगावी मसगा महाविद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. या घटनेची माहिती गावात कळताच सर्वत्र शोककळा पसरली. जाधव बंधूच्या पश्चात आजी, आई व वडील असा परिवार आहे.