मालेगाव – मालेगावातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता रुग्णांना ऑक्सीजनची कमतरता भासु नये यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शहरातील सामान्य रुग्णालय येथे ६ हजार लिटर क्षमतेचे ऑक्सीजन टँक मंजुर करण्यात आले असल्याची माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार असून पुढील एका महिन्यात हे टँक कार्यान्वित होणार आहे.
शहर व तालुक्यात पुन्हा करोनाचे रुग्णसंख्या वाढत आहे. आजपर्यंत महापालिका क्षेत्रात १ हजार ४५१ तर ग्रामीण भागात ५६३ इतकी रुग्णसंख्या झाली. रुग्णसंख्या लक्षात घेता शहरात मसगा कोविड सेंटर सुरु करण्यात आले असून लवकरच हज हाउस व दिलावर हाउस येथील कोविड सेंटर देखील सुरु केले जाणार आहे. दरम्यान रुग्णांना रोजच्या रोज लागणा-या ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मनपा आरोग्यअधिकारी डॉ. सपना ठाकरे माहिती दिली.
शहरातील एकूण रुग्णसंख्येपैकी बाराशेहून अधिक रुग्ण गृहविलगीकरणात आहेत तर सहारा व सामान्य रुग्णालयात प्रत्येकी ७९ रुग्ण उपचार घेतात. नव्याने सुरु करण्यात आलेल्या मसगा कोविड सेंटर येथे ४० रुग्ण दाखल झालेत. यासह सिक्स सिग्मा, द्वारका, लोट्स, जीवन या खाजगी रुग्णालयात देखील करोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील रुग्णांना ऑक्सिजन सिलेंडरचा पुरवठ्यात तुटवडा होत असल्याच्या तक्रारी होत्या. परंतु सिलेंडरचा तुटवडा भासू दिला नसून त्यासाठी महापालिका प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली असल्याचे आरोग्याधिकारी डॉ. ठाकरे यांनी सांगितले.
लसिकरणाला वेग हवा
शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतांना दुसरीकडे लसीकरण देखील सुरु आहे. महापालिकेच्या पाच तर खाजगी १७ केंद्रांवर लसीकरण होते आहे. आज पर्यंत १० हजार ८९० जणांना पहिला डोस तर २ हजार २१३ जणांना दुसरा डोस देण्यात आला. मुस्लीमबहुल असलेल्या पूर्वभागात मात्र लसीकरणला फारसा प्रतिसाद नसल्याने प्रशासनापुढे मोठे आव्हान आहे. तर मनपाचे लसीकरण केंद्र वाढवून लसीकरण वेग वाढवण्याची मागणी नागरिकांकडून होते आहे.