मालेगाव : ब-सत्ताप्रकार अथवा अन्य कोणताही सत्ताप्रकार म्हणून नोंदविलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ या धारणाधिकारामध्ये रुपांतरण करण्याबाबत शासन आदेश निर्गमीत करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सत्ता प्रकारातील त्रुटीमुळे नागरिकांना वेठीस धरु नका व प्रलंबीत प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सुचना राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृहात भोगवटादार वर्ग-२ जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरीत करणेबाबत आयोजित आढावा बैठकीत ना. भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, तहसिलदार चंद्रजित राजपूत, नगर भुमापन अधिकारी जितेंद्र भिंगारदिवे, उपअधिक्षक भुमी अभिलेख भगवान शिंदे, सहायक दुय्यम निबंधक पी. एन. लहाने, एस. व्ही. वाघ, पी. डी. वाघचौरे, संजय दुसाने, ॲड. सतिष कजवाडकर, बंडू माहेश्वरी, संतोष बोडके, संजय जोशी, राजेंद्र साळुंखे, शाम अग्रवाल, खोडके, काबरा, हर्षद तिवारी आदी उपस्थित होते.
सत्ता प्रकारातील त्रुटीच्या प्रकरणातील सुमारे ५० ते ७५ टक्के प्रकरणांचा निपटारा हा १५ मार्च च्या शासन आदेशानुसार होईलच, परंतू उर्वरित प्रकरणांसाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातील असेही ना. भुसे यावेळी म्हणाले. तर ब-सत्ता मिळकतीबाबत मुळ धारकाच्या रक्तनातेसंबंधातील वारसांची नावे मिळकत पत्रिकेवर लावण्याबाबतही आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नगर भुमापन कार्यालयाच्या कामकाजाबाबत वाढत्या तक्रारीमुळे ना. भुसे यांनी नाराजी व्यक्त करताना ते म्हणाले, महसूल व नगर भुमापन विभागाने समन्वय साधत सातबारा उतारा व मिळकत पत्रिकेमध्ये मेळ घालून नागरिकांना दिलासा देण्याचे काम करावे. सत्ता प्रकारातील दुरूस्तीची प्रकरणे जमा करण्यासाठी एक खिडकी योजना कार्यान्वित केल्यास नागरिकांची कामे सुलभ करून लोकाभिमुख प्रशासनाची अनुभूती द्यावी.
कोरोनाच्या महामारीचा मुकाबला करताना शासनाच्या तिजोरीवरील बोजा वाढला असून सत्ता प्रकार बदलामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळणार आहे. त्याच बरोबर नागरिकांचे देखील प्रलंबीत प्रश्न मार्गी लागणार असल्याने नगर भुमापन कार्यालयाने तात्काळ या शासन आदेशाची अंमलबजावणी करत महिनाभरात प्रलंबीत प्रस्ताव मार्गी लावण्याचे निर्देशही ना. भुसे यांनी यावेळी दिले. तर नगर भुमापन अधिकारी यांनी सत्ता प्रकार बदलाबाबत विहीत नमुन्यातील अर्ज, मिळकतीचे मुल्यांकन, सहधारकांचे संमतीपत्र, जागेचा नकाशा, मिळकत पत्रिकेची नक्कल या कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले. त्याच बरोबर अशा मिळकतींवर रक्तनातेसंबंधातील वारसाचे नाव लावण्यासाठी वाटप पत्र, बक्षिस पत्र, वारस नोंद, मृत्यू दाखला, वारसदारांचे हमीपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव सादर केल्यास २१ दिवसात मिळकत पत्रिकेवर नोंद घेण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.