मालेगाव : तालुक्यासह जिल्ह्यात रेमडेसिव्हिरचा तुटवडा भासत असून औषधांच्या दुकानांसमोर मोठ्या रांगा दिसत आहेत. या अनुषंगाने रेमडेसिव्हिरचा कृत्रीम तुटवडा निर्माण करून त्याचा काळाबाजार होणार नाही, यासाठी औषध दुकानांची पथकांमार्फत तपासणी करून शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेमडेसिव्हिरचे वितरण व्हावे, असे निर्देश राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृहात आज सर्व विभाग प्रमुखांची कोरोना संदर्भातील आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी ना. भुसे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी डॉ. विजयानंद शर्मा, पोलीस उपअधिक्षक प्रदीप जाधव, महानगर पालिकेचे उपायुक्त रोहिदास दोरकुळकर, तहसिलदार चंद्रजित राजपूत, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, बाजार समितीचे उपसभापती सुनिल देवरे, सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. किशोर डांगे, डॉ. हितेश महाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, डॉ. शुभांगी अहिरे, डॉ. योगेश पाटील, डॉ. लोथे, संजय दुसाने, रामा मिस्तरी, मनोहर बच्छाव, प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
रेमडेसिव्हिरचा पुरवठा कमी होत असल्यास तातडीने मागणी नोंदविण्याचे सांगतांना ना. भुसे म्हणाले, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय रेमडेसिव्हिरचा पुरवठा करण्यात येवू नये. रुग्णांना गरज नसतांनाही काही नागरिक रेमडेसिव्हिरचा साठा करत असून रेमडेसिव्हिरबाबत नागरिकांमधील संभ्रम दुर करावा जेणेकरून ज्या रुग्णास रेमडेसिव्हिरची गरज आहे तो यापासून वंचित राहता कामा नये. रेमडेसिव्हिर बरोबरच ऑक्सिजन व्हेटींलेटर, मनुष्यबळाचा तुटवडा भासणार नाही यासाठी नियोजन करण्याच्या सुचनाही ना. भुसे यांनी यावेळी केल्या.
लसीकरणाच्या बाबतीत शहरातील मुस्लीमबहुल भागात उदासिनता दिसून येत आहे. यासाठी या भागातील लोकप्रतिनीधी, मौलाना, धर्मगुरूंच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करून जास्तीतजास्त नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे. तर पश्चिम भागातील लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे. सर्व शासकीय व खाजगी कोवीड रुग्णालयातील उपलब्ध खाटा, व्हेंटीलेटर, ऑक्सिजन आदी माहिती दर्शनी भागावर फलकाव्दारे प्रकाशित करून ती दररोज अद्यावत करण्यात यावी. सामान्य रुग्णालयात व्हॅन्टिलेटरची संख्या वाढविण्यात आली असली तरी त्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी पाठपुरावा करण्यात यावा. मागील बैठकीत सुचना करूनही एमबीबीएस दर्जाचे वैद्यकीय अधिकारी भरती न केल्यामुळे व शहरातील स्वच्छतेबरोबर फवारणीच्या कामकाजात उदासिनता दिसून येत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.
ग्रामीण भागात चाचण्यांचे प्रमाण वाढविल्याने रुग्णवाढ दिसत असली तरी एकूण चाचण्यांच्या टक्केवारीनुसार रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. ग्रामीण भागातील गृहविलगीकरणातील रुग्णांवर पोलीस प्रशासनाने कारवाई केली असल्यास अशा रुग्णांना तात्काळ मालेगाव येथील कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल करावे. ग्रामीण भागातील डी. सी. एच. सी. सेंटर वाढविण्यात येवून भायगाव येथील कोवीड केअर सेंटरचा पूर्णक्षमतेने वापर करावा. मनमाड, चांदवड, देवळा, सटाणा येथील बहुतांशी रुग्ण मालेगाव येथे उपचार घेत आहेत. या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य प्रशासनावरील ताण वाढला आहे तरी जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या अधिकारांचा पुरेपूर वापर करून स्थानिक पातळीवर तात्काळ निर्णय घेवून जलद कारवाई करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.