मालेगाव – तस्करीसाठी आणण्यात आलेले दुर्मिळ मांडूळ मालेगाव वनपरिक्षेत्र यांनी जप्त केले असून तीन संशयीतांना ताब्यात घेतले आहे. येथील उपविभागीय वनपरिक्षेत्राचे उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांना सोलापूरचे मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य रोहन भाटे यांनी गुप्त माहिती दिली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
दिलेल्या माहितीनुसार जिल्हा नाशिक आग्रा महामार्ग रोडवरील स्टार हॉटेल मध्ये काही इसम सर्प वर्गातील दुर्मिळ असलेल्या मांडूळ जातीचे साप विक्रीसाठी घेऊन येणार होते. त्यानुसार मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास डी. कांबळे व त्यांच्या पथकाने हॉटेल स्टार येथे सापळा रचला व बनावट खरेदीदार पाठवून मिळालेल्या माहितीची खातरजमा केली. परंतु, विक्रीसाठी आलेल्या संबंधित इसमाना संशय आल्याने त्याठिकाणी व्यवहार होऊ शकला नाही व संशयित तेथून ते फरार झाले.
कांबळे यांनी या व्यवहारात मध्यस्थ असलेल्या व्यक्तीशी पुन्हा संपर्क साधून व्यवहाराबाबत बोलणी केली.
त्यामुळे मांडूळ विक्रेत्यांनी मालेगाव तालुक्यातील करांजगव्हान-टिंगरी रस्त्यावरील मोरझरी परिसरातील म्हसोबा मंदिराजवळ व्यवहारासाठी बोलविले असता त्याठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी विलास कांबळे व त्यांच्या पथकाने छापा टाकला असता त्याठिकाणी जमलेल्या गर्दीचा फायदा घेऊन मुख्य चार आरोपी मांडूळ असलेली बॅग टाकून पसार झालेत.
या कार्यवाहीत वनपथकाने ३ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून याबाबत अधिक तपास उपविभागीय वनाधिकारी जगदीश येडलावार यांच्या मार्गदर्शनाखाली मालेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी विलास डी कांबळे यांच्यासह वनपाल अतुल देवरे, बी एस सुर्यवंशी, सागर पाटील वनरक्षक बागुल, रफिक पठाण, तुषार देसाई, अनिल ठाकरे आदी करीत आहेत.