पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या हातून तक्रारदारस साडेआठ लाख परत
…
मालेगाव – जळगाव जिल्हयातील चाळीसगाव तालुक्यातील लोंढे येथील कापूस व्यापारी सुनिल श्रावण चौधरी यांची चोरट्यांनी लांबविलेली ८ लाख ४७ हजार ५०० रोख रक्कम पोलिसांनी त्यांना परत केली. या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी ही रक्कम न्यायालयाच्या आदेशाने शुक्रवारी नाशिक ग्रामीण जिल्हयाचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या हस्ते चौधरी यांना सुपूर्द करण्यात आली.
चौधरी हे मालेगाव येथून शेतक-यांचे कापूस विक्रीचे आलेले पैसे घेऊन मोटर सायकलने चाळीसगाव येथे जात असतांना, मालेगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीत सायने गावचे शिवारात चाळीसगाव जाणारे रोडवर अज्ञात तीन आरोपींनी मोटर सायकलवर येऊन सुनिल चौधरी यांची बॅग रक्कमेसह लांबविली होती. यावेळी चोरट्याने त्यांना लाकडी दांडयाने डोक्यावर मारून, खाली पाडून पिस्तुलचा धाक दाखवला होता. या प्रकरणी मालेगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर गुन्हयाचे तपासात आरोपी खुशाल अशोक मोकळ, रितीक राजेंद्र राजपुत, अविनाष सुरेश माने, तिघे रा. धुळे, यांना नाशिक ग्रामीण पोलीसांतर्फे अटक करण्यात आली होती. आरोपींकडे सखोल तपास करून त्यांच्याकडून या गुन्हयात लुटमार करून नेलेली ८ लाख ४७ हजार ५०० रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यानंतर ही रक्कम चौधरी यांना देण्यात आली.
ही रक्क्म अदा करतांना यावेळी मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे मुद्देमाल अंमलदार सपोउनि साळी व पोकाॅ बल्लाळ हे हजर होते. यावेळी चौधरी यांनी पोलिसांचे आभार मानले.