मालेगाव : मालेगाव शहरात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असले तरी सुध्दा येथील डॉक्टर्स कोरोना रूग्णांवर योग्य प्रकारे उपचार करीत आहेत. कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महापालिकेचे बंद असलेले ४५-४५ खाटांचे दोन कोविड सेंटर त्वरीत सुरू करण्याच्या सुचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी दिल्या.
धुळे येथील दौरा आटोपून सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिककडे जाताना आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी अचानक मालेगाव येथील सामान्य रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी सामान्य रुग्णालयाची पाहणी करीत रूग्ण व त्यांच्या नातलगांशी तसेच अडीअडचणी संदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलतांना डॉ. टोपे यांनी कार्यरत असलेले डॉक्टर्स चांगले काम करीत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
सामान्य रूग्णालयात २०० खाटांची व्यवस्था असून या ठिकाणी ऑक्सिजनसह सर्व सुविधा उपलब्ध आहेत. शहरातील काही खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रूग्ण दाखल आहेत. त्या ठिकाणी असणाऱ्या रूग्णांसाठी लागणारा ऑक्सिजनचा तुटवडा भासत आहे. त्यावर लवकरच उपाययोजना केली जाईल. ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून राज्यात ठिक ठिकाणी लिक्कीड ऑक्सिजनचे स्वतंत्र टॅक उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर मालेगावी २० हजार लिटर क्षमतेचा स्वतंत्र लिक्कीड ऑक्सिजन टॅक उभारण्यासाठी फुड व ड्रग्जचे आयुक्त अभिमन्यू काळे यांच्याशी चर्चा केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना सुचना केली असून लवकरच मालेगावकरांच्या सेवेत लिक्कीड ऑक्सिजन टॅकची सेवा सुरू होईल. या ठिकाणी व्हेंटीलेटर येथे उपलब्ध असून रेमडिसीवरचा मात्र तुटवडा जाणवत आहे. त्यावरही तोडगा काढण्यात येईल. महापालिकेचे बंद असलेले ४५-४५ खाटांचे दोन कोविड सेन्टर त्वरीत सुरू करण्याच्या सुचना राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी दिल्या. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी मनुष्यबळ कमी असल्याचे ना. टोपे यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी त्वरीत जागा भरण्याचे आदेश दिले. संबंधीताना एनएचयुएमच्या माध्यमातून पगार देण्यात येईल असे सांगून येत्या दोन-तीन दिवसात हे कोविड सेंटर पूर्ण क्षमतेने चालू होईल असा विश्वासही ना. टोपे यांनी व्यक्त केला. यावेळी मालेगाव मध्यचे आमदार मुफ्ती मोहंमद इस्माईल, मनपाचे उपायुक्त नितीन कापडणीस, डॉ. हितेश महाले यांच्यासह महापालिका अधिकारी, डॉक्टरर्स उपस्थित होते.
मुस्लिम बांधवांनी लसीकरण करून घ्यावे
कोरोनावरील लस ही पुर्णतः सुरक्षित आहे. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. मालेगाव शहरातील विशेषता पश्चिम भागातील मुस्लिम बांधवांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी केले. यावेळी बोलतांना आमदार मुफ्ती मो. इस्माईल यांनी अधिकारी लसीकरणासंदर्भात माहिती देत नसल्यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे सांगितले. यावेळी ना. टोपे यांनी महापालिका आयुक्त, उपायुक्त यांनी ३-४ जणांची समिती बनवून लसीकरणाची मोहीम राबवावी. त्यासाठी लसीकरणाचे केंद्र वाढवावे अशा सुचनाही केल्या. मालेगावी पुर्व व पश्चिम भागात लसीकरण पुर्ण झाल्यास कोरोनाची भिती राहाणार नाही असा विश्वासही आरोग्यमंत्री डॉ. टोपे यांनी यावेळी व्यक्त केला