मालेगाव – काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर माजी आमदार आसिफ शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. गुरुवारी सकाळी ११ वाजता मुंबई येथे त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. मालेगाव येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी याची माहिती दिली. राजीनाम्या नंतर त्यांनी शहरात चौक सभा, बैठका घेऊन पुढील राजकीय वाटचालीबाबत निर्णय घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरिक यांच्याशी चर्चा केली होती. पत्रकार परिषदेत शेख यांनी सांगितले की, शहर विकाससंबंधी १५ मुद्दे मी राष्ट्रवादी पक्षाच्या वरिष्ठांना दिले होते. या मुद्द्यावर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी ते सोडविण्याचे आश्वासन दिले. तसेच राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे आमंत्रण दिले. गुरूवारी मोजक्या कार्यकर्त्यांच्या समवेत अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी शेख यांनी दिली.