मालेगाव : मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. सोमवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी स्वतः याची घोषणा केली. शेख यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला धक्का बसला. गेली दोन दशके आपण काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते राहिलो आहे. काँग्रेस मध्ये प्रामाणिकपणे काम केले. परंतु माझ्या वैयक्तिक कारणासाठी राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील काळात कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय ते घेणार आहेत.
आसिफ शेख यांची राजकीय कारकीर्द वयाच्या १९ व्या वर्षी सुरू झाली. १९९८ मध्ये त्यांनी यूथ काँग्रेसचे सचिव पद भूषविले, तसेच सन २००२ ते २०१२ पर्यंत ते काँग्रेस पक्षाचे नगरसेवक देखील राहिले आहेत. याच दरम्यान सन २००५ ते २००७ या कालावधीत ते महापालिका महापौर पदी विराजमान झाले होते. तर २००७ ते २०१२ पर्यंत त्यांनी गटनेता म्हणून आपली चोख भूमिका देखील बजावली. २०१४ मध्ये काँग्रेस पक्षातर्फे ते आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र २०१९ च्या निवडणुकीत त्यांना एम आय एम चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता.