मालेगाव – मालेगाव महानगरपालिकचे प्रभाग क्रमांक ४ चे प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे आणि लिपीक हिरालाल मोतिराम गागडा यांना तीन हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. मंगळवारी (५ जानेवारी) ही कारवाई करण्यात आली.
मेडिकल दुकान सुरु करण्यासाठी त्या जागेवर कराची थकबाकी नसल्याचा ना हरकत दाखला (NOC) देण्यासाठी सोनवणे याने ३ हजार रुपयांची लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने एसीबीशी संपर्क साधला. एसीबीने सापळा रचला. सदर लाचेची रक्कम महानगरपालिकेच्या नगरसचिव कार्यालयात घेताना सोनवणेसह गागडा यास रंगेहाथ पकडण्यात आले. या सापळ्यात पोलिस निरीक्षक मृदुला नाईक, पोलिस निरीक्षक किरण रासकर, पोलिस हवालदार कुशारे, हवालदार गोसावी, हवालदार मोरे यांनी हा सापळा रचला. याप्रकरणी सोनवणे व गागडा यांना अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, लाच देणे आणि घेणे हा गुन्हा आहे. यासंदर्भात एसीबीला माहिती देण्यासाठी १०६४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.