मालेगाव – महापालिका आयुक्त त्र्यंबक कासार यांच्याविरोधातील अविश्वास ठराव अखेर बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. या ठरावासाठी आज गुरुवारी (दि.२५) विशेष महासभेचे आयोजन करण्यात आले होते. या ठरावापूर्वी आयुक्तांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. मालेगाव महानगरपालिकेत ८४ नगरसेवक असून १ जागा रिक्त आहे. त्यात २ एमआयएम व १ शिवसेनेचा नगरसेवक गैरहजर होता. त्यामुळे एकुण ८० नगरसेवक हजर होते. त्यांनी सर्वांनी बहुमताने हा ठराव मंजूर केला. ८० नगरसेवकांमध्ये कँाग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनता दल, एमआयएम, भाजप यांचा समावेश आहे. हा ठराव काँग्रेस व शिवसेना नगरसेवकांनी आणला होता. पण, याला सर्वांनी पाठींबा दिला.
आयुक्त कासार यांच्यावर दाखल अविश्वास प्रस्तावाच्या मंजुरीसाठी आज महापौर ताहेरा शेख यांनी गुरुवारी विशेष महासभेचे आयोजन केले होते.एमआयएमचे नगरसेवक डॉ. खालिद परवेज तसेच जनता दलाचे मुश्तकिम डीग्नीटी यांनी उर्दू मीडिया सेंटर येथे वेगवेगळी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती.
आयुक्त कासार यांनी मनपाची आर्थिक लूट केली असून त्यांची चौकशी होणे गरजेचे आहे. वॉटरग्रेस कंपनीचा स्वच्छता ठेका, गिरणा पंपीग स्टेशन वरील पंप दुरुस्ती, वाहन खरेदी आदी प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. अखेर बहुमताने त्यांच्याविरोधात ठराव संमत करण्यात आला आहे. हा ठराव आता राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविला जाणार आहे.