मालेगाव – शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच दुसरीकडे शासनाच्या मार्गदर्शक सुचना व जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन करीत कमालपुरा भागात धुमधडाक्यात लग्नाचे आयोजन करणाऱ्या फारूख खान फैजुल खान याच्यावर कारवाई करीत एक हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा सुध्दा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना विषाणू आजाराला पायबंद घालण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घातले आहेत. त्यामुळे मालेगाव शहरात शासनाच्या मार्गदर्शक सुचना व जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन करणाऱ्यांवर विरूद्ध कारवाई करण्यासाठी उपायुक्त मुख्यालय रोहिदास दोरकुळकर तसेच उपायुक्त विकास तथा इन्सिडेंट कमांडर नितीन कापडणीस यांनी प्रत्येक प्रभागातील प्रभाग अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पथक नेमले असून सहायक आयुक्त तुषार आहेर यांच्या नियंत्रणाखाली आदेशाची काटेकोर अंमलबजावणी नियमित केली जात आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा प्रभाग अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकाद्वारे दररोज दंडात्मक धडक कारवाई करण्यात येत आहे. शासनाने लग्न समारंभ देखील कमी नातलगांच्या उपस्थितीत करण्याचे निर्देश दिले आहेत. असे असताना देखील कमालपुरा भागातील फारूख खान फैजुल खान यांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचना व जिल्हा दंडाधिकारी यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लघन करीत २५ पेक्षा जास्त नातलगांच्या उपस्थितीत धुम धडाक्यात लग्नाचे आयोजन केले म्हणून त्यांच्यावर महापालिका व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने कारवाई करीत एक हजार रूपयांचा दंड केला.. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांवर वचक निर्माण होऊन त्यांचे धाबे दणाणले आहे.