मालेगाव : तालुक्यात मंगळवारी (दि.२२) वादळी वाऱ्यासह गारपिटीत झालेल्या पावसाने तब्बल चार हजार २९४ हेक्टर शेती व फळ पिकाचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर केला असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी दिली.
चार-पाच वर्षांपासून मालेगाव तालुक्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळासारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. त्यातच कांद्यासह कोणत्याच शेतपिकाला बाजारभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडून पडते. तरी देखील शेतकरी नव्या उमेदीने हंगामासाठी सज होत असतो. त्याप्रमाणेच या वर्षी देखील तालुक्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका यांसह मोठया प्रमाणात उन्हाळी कांद्याची लागवड केली.
आधीच कोरोनामुळे शेतकरी त्रस्त असताना आता अवकाळी पावसानेही शेतकऱ्यांना लक्ष केले आहे. तालुक्यात मंगळवारी (दि.२२) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीत झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या गारपिट व अवकाळी पावसामुळे तालुक्यातील दाभाडी, वऱ्हाणे, वऱ्हाणे पाडा, घोडेगाव चौकी, मेहुणे, मळगाव, साकुरी, निंबायती, निमगुले, निमगाव, सोनज, चौकट पाडे, जाटपाडे, जेऊर, पाथर्डे, गिलाने, खायदे, डुबगुले आदी २० गावांमधील पाच हजार २६९ शेतकऱ्यांचे चार हजार २९४ हेक्टर शेती व फळ पिकाचे नुकसान झाले आहे. यात दोन हजार ५१४ हेक्टरवरील सर्वात जास्त कांद्याचे नुकसान झाले आहे. फळ व शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर केला असून पंचनामे सुरु असल्याचे ही तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी सांगितले.
पिक हेक्टर
गहू ५३५
हरभरा १६५
कांदा २५१४
मका २९०
बाजरी ६२
भाजीपाला ११०
भुईमूग २१
टरबूज ४६
डाळिंब ५३५
अंजीर ५
लिंबू ६
पपई ६