नाशिक – राज्य शासनातर्फे देण्यात येत असलेल्या कृषी पुरस्कारात जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०१९ हा पुरस्कार मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील सुनीता राजाभाऊ खेमनार यांना मिळाला आहे. बुधवारी राज्य शासनाने २०१८-१९ या वर्षातील कृषी पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये नाशिक जिल्हयातील १४ जणांचा समावेश आहे.
या पुरस्कारामध्ये वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०१८ हा सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील कारभारी महादू सांगळे यांना मिळाला. उद्यानपंडीत पुरस्कार २०१८ हा सुरगाणा तालुक्यातील सिताराम काळू चौधरी यांना मिळाला. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१८ हा नाशिक तालुक्यातील दोनवडे येथील बबनराव धोंडीराम कांगणे, दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील नामदेवराव शिवाजीराव बस्ते, सिन्नर तालुक्यातील वडगाव येथील भागवत विठोबा बलक यांना मिळाला. आदीवासी गटात पेठ तालुक्यातील शामराव काशिनाथ गांवढे यांना मिळाला.
जिजामाता कृषिभूषण पुरस्कार २०१९ हा येवला तालुक्यातील संगिता वाल्मिक सांगळे, मालेगाव तालुक्यातील साकुरी येथील सुनीता राजाभाऊ खेमनार यांना मिळाला. कृषिभूषण (सेंद्रिय शेती) -२०१९ हा पुरस्कार पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील यशवंत महादु गावंडे यांना मिळाला. वसंतराव नाईक शेतिमित्र पुरस्कार २०१९ हा पाथर्डी फाटा येथील श्रध्दा सुनिल कासुर्डे यांना मिळाला. तर उद्यानपंडीत पुरस्कार २०१९ हा देवळा तालुक्यातील वाजगाव येथील बाळासाहेब कडू देवरे यांना मिळाला. वसंतराव नाईक शेतिनिष्ठ शेतकरी पुरस्कार २०१९ सर्वसाधारण गट हा पुरस्कार मालेगाव तालुक्यातील सातमानेता येथील विनोद कृष्णा जाधव, बागलाण तालुक्यातील जुनेनिरपूर येथील एकनाथ शंकर चव्हाण यांना मिळाला. आदीवासी गटातील पुरस्कार सुरगाणा तालुक्यातील दुर्गापूर येथील सिताराम अर्जून हाडस यांना मिळाला.
असे असतात पुरस्कार
राज्य शासनाच्या वतीने कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादनामध्ये उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना विविध कृषी पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये डॅा. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण, कृषिभूषण (सेंद्रीय शेती) , वसंतराव नाईक शेतीमित्र, वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी, उद्यान पंडित, पद्यश्री डॅा. विठ्ठलराव विखे – पाटील, कृषी सेवारत्न असे पुरस्कार देण्यात येतात. तसेच राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील विजेत्या शेतक-यांनाही सन्मानित करण्यात येते. गेले दोन तीन वर्षे हे पुरस्कार जाहीर झाले नव्हते.