मालेगाव – मालेगाव तालुक्यात कोरोनाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. रुग्णांना दाखल करण्यासाठी पुरेशा खाटांची व्यवस्था नाही. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. मालेगावात जागा उपलब्ध नसल्याने रुग्णांना सटाणा रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे. आरोग्य विभाग व प्रशासन पुर्णपणे निष्क्रीय ठरत आहे. कोरोना रुग्णांना अक्षरश: वाऱ्यावर सोडून देण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभाग व प्रशासनातर्फे मालेगाव तालुक्यात कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते डॉ. जयंत पवार यांनी आरोग्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात केला आहे.
मालेगाव तालुक्यात पंधरा दिवसापासून मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. दाभाडी, झोडगे, पिंपळगाव, रावळगाव, तळवाडे, वडेल, ढवळीविहिर आदी माेठ्या गावांमध्ये तर प्रचंड संख्येने रुग्ण आहेत. जवळपास प्रत्येक गावात कोरोनाचे रुग्ण रोज आढळत आहेत. शहरी भागातील रुग्णांसाठी एमएसजी कॉलेज व सहारा हॉस्पीटलमध्ये सुविधा आहे. ग्रामीण भागातील रुग्णांची मात्र हेंडसाळ होत आहे. दाभाडीचे कोविड सेंटर बंद करण्यात आले आहे. झोडगे येथे पुरेशा खाटा उपलब्ध नाहीत. अन्य ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीत. घाबरलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना व्यवस्थित मार्गदर्शन केले जात नाही. कृषिमंत्री दादा भुसे यांचे सुध्दा या बाबीकडे दुर्लक्ष आहे. मालेगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोराेना रुग्णांसाठी चार ते पाच ठिकाणी कोविड सेंटर तातडीने सुरु करावेत. या ठिकाणी ऑक्सिजन व्हॅन्टिलेटर आदी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. चाचण्यांची संख्या वाढवावी. नागरिकांमध्ये जनजागृती करावी. कोरोनाने संपुर्ण मालेगाव तालुक्याला विळखा घातला आहे. कोराेना रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी ठोस व प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी डॉ. जयंत पवार यांनी निवेदनात केली आहे.