मालेगाव – शहरालगत असलेल्या मुंबई आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा परिसरात दुचाकी व आयसर वाहनात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवर असलेले दोघे जण जागीच ठार झालेत. चाळीसगावकडून धुळेच्या दिशेने जाणा-या दुचाकी क्रमांक (एमएच १९ डीए ४३५२) ला मालेगावहून धुळेकडे जाणा-या ट्रकने (एमएच १८ बीजे ०११७) जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या दोघांचा मृत्यू झाला. पंकज मुरलीधर पाटील (रा. पिंप्री ता. चाळीसगाव) असे मृत दुचाकी चालकाचे नाव असून मृत स्त्रीची ओळख पटू शकेलेली नाही. अपघाची माहिती मिळताच माजी आमदार आसिफ शेख यांनी चाळीसगाव फाटा येथे धाव घेतली. संतप्त शेख व कार्यकर्त्यांनी महामार्गावर थेट रस्तारोको केला. यामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूकीचा खोळंबा झाला होता. महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याची कामे केली जात असून त्यानंतर मात्र महामार्गावर गतिरोधक टाकण्यात आलेले नाहीत. रस्त्यावर हायलाईट बेल्ट, रेडियम लाईट्स लावण्यात आलेले नाहीत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. चाळीसगाव फाटा परिसरात वाहतूक वर्दळ वाढली असून देखील येथे पोलीस तैनात नाहीत असा आरोप त्यांनी यावेळी केला. अखेर तालुका पोलिसांनी शेख यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेत मागण्या समजून घेतल्या. येत्या चार दिवसात गतिरोधक टाकावे अपघात कमी व्हावेत यासाठी उपाययोजना कराव्यात अन्यथा रस्ता खोदून चक्का जाम आंदोलन करू असा इशारा शेख यांनी देत आंदोलन मागे घेतले. दुचाकीस्वाराचे मृतदेह शवविच्छेदनसाठी सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. याप्रकरणी ट्रकचालक द्रोणागिरी नथू गोसावी (रा. अवधान धुळे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.