मालेगाव -ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात गृह विलगीकरणात असून रुग्णसंख्या देखील वाढत आहे. गृह विलगीकरणातील रुग्णांनी गृह विलगीकरणाच्या नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यामार्फत इतर नागरिकांच्या आरोग्यास व जिवितास धोका निर्माण होवू शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव व प्रसार होण्याची शक्यता पडताळून गृह विलगीकरणातील रुग्णांना गावातीलच जिल्हा परिषद शाळेत संस्थात्मक विलगीकरणासाठी तात्काळ स्थलांतरीत करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी डॉ. विजयानंद शर्मा यांनी पारित केले आहेत.
मालेगाव तालुक्यातील ज्या गावांमध्ये कोरोना आजाराचे रुग्ण आढळून आलेले आहेत. त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, आरोग्य सेवक, आशा सेविका, पोलीस शिपाई यांची नियुक्ती करण्याबाबत या आदेशात नमूद केले आहे. कोरोनाच्या गृह विलगीकरणातील रुग्णांना स्थलांतरित करतांना प्रथमत: आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी रुग्णांची कोरोनाच्या संदर्भातील आरोग्य तपासणी करावी. त्यानंतर ग्रामसेवक, पोलीस पाटील, तलाठी व पोलीस शिपाई यांनी सदर रुग्णास जिल्हा परिषद शाळेमध्ये स्थलांतरीत करावे. आरोग्य सेवक व आशा सेविका यांनी शाळेतील रुग्णांची दोन वेळा दैनंदिन तपासणी करावी व त्यांना वेळेवर औषधोपचार मिळतील याची खात्री करावी.
संबंधित गावातील पोलीस पाटील, ग्रामसेवक व तलाठी यांनी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील रुग्णांवर देखरेख ठेवून त्यांना शाळेच्या बाहेर जाण्यापासून प्रतिबंध करावा. याकामी संबंधित गावाचे सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची मदत घ्यावी. बाहेरील व्यक्तींना शाळेजवळील परिसरात संचार, वाहतूक, उभे राहणे, थांबून राहणे, रेगांळणे या सर्व कृत्यांना मनाई करावी व रुग्णांशी संपर्क होणार नाही याची काळजी घ्यावी. त्याच बरोबर या आदेशाचे उल्लघन करणाऱ्या संबंधितांविरूध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ व ५६ अन्वये तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे असे मानण्यात येईल व त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करण्यात येईल असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वरील आदेशाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांचा सहभाग असलेली समिती गठीत करण्यात आली असून प्रातांधिकारी डॉ. शर्मा यांच्यासह तहसिलदार चंद्रजीत राजपूत, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, तालुका आरोग्य अधिकारी शैलेश निकम, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डुमने यांनी तालुक्यातील दसाणे, खडकी, वडगाव, करंजगव्हाण, वजीरखेडे या गावांना भेटी देवून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी गावकऱ्यांनी देखील या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे प्रातांधिकारी डॉ. शर्मा यांनी कळविले आहे. त्याच बरोबर ग्रामीण भागातील जे रुग्ण जिल्हा परिषदेच्या शाळेत विलगीकरणासाठी नकार देतील अशा रुग्णांचे मालेगाव शहरातील कोवीड केअर सेंटर मध्ये रवानगी करण्याच्या सुचनाही प्रातांधिकारी डॉ. शर्मा यांनी दिल्या आहेत.