मालेगाव – चाळीसगाव फाटा भागात विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका संशयतीला तालुका पोलीसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला. महामार्गावरील चाळीसगाव फाटा परिसरातील चाळीसगाव रस्त्यावरील एका शेड मध्ये एक इसम गावठी कट्टा बाळगून असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस नाईक सुभाष चोपडा यांना मिळाली होती. या माहितीनुसार पोलीस अधीक्षक सचिन पाटील व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या आदेशावरून तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक देविदास ढोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई कैलास चोथमल व चोपडा यांनी सोमवारी (दि.५) रोजी चाळीसगाव रस्त्यावरील एका शेडवर छापा मारून संशयित फैजान अहमद शब्बीर अहमद (रा. नयापुरा) यास ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी कट्टा मिळून आला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.