मालेगाव – शहरासह तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या चिंताजनक असून पुढील पंधरा दिवस महत्वाचे आहेत, या कालावधीत कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करत प्रतिबंधात्मक आदेशाचे पालन करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.
तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाची आढावा बैठक शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. कोवीड रुग्णांना गृहविलगीकरणापूर्वी त्यांच्या कुटूंबातील कोमॉर्बींड रुग्णांची माहिती घेण्याच्या सुचना देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, गृहविलगीकरणासाठी मर्यादा घालण्यात याव्यात. गृहविलगीकरणात असलेला रुग्ण सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सामान्य रुग्णालयातील नॉन कोवीड रुग्णांना शहरातील महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेतंर्गत असलेल्या सहा रुग्णालयात स्थलांतरीत करण्याची शक्यता पडताळून आवश्यक ती कार्यवाही करावी. सर्व रुग्णालयात ऑक्सिजनसह मेडीसीन व उपलब्ध खाटांचा आढावा घेत ग्रामीण भागातील संभाव्य रुग्णसंख्या विचारात घेवून महानगरपालिकेमार्फत आवश्यक खाटा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी महानगरपालिका प्रशासनास केल्या.
कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यापासून थकीत असलेले वेतन तातडीने प्रदान करण्याची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले, प्रत्येक रुग्णालयात किमान एक एम.बी.बी.एस वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी.
एन.डी.आर.एफ. अंतर्गत निधी उपलब्ध होण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. रुग्णवाढीचा विचार करून आवश्यक ती पुर्व तयारी करण्यात यावी. ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेण्याचेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी महापौर ताहेरा शेख, आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत खांडवी, उपविभागीय अधिकारी डॉ.विजयानंद शर्मा, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस, तहसिलदार चंद्रजित राजपूत, उप विभागीय पोलीस अधिकारी लता दोंदे, वैद्यकीय अधिक्षक किशोर डांगे, डॉ.हितेश महाले, डॉ.सपना ठाकरे यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.