मालेगाव: अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये दुचाकी वाहन धारकांचे प्रमाण अधिक आहे. मृत्युचे मुख्य कारण म्हणजे डोक्याला गंभीर ईजा होणे. नियंत्रीत वेग व हेल्मेटचा नियमीत वापर दुचाकी वाहनधारकांनी केला तर मृत्युचे प्रमाण कमी होईल असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला.
३२ वे रस्ता सुरक्षा अभियान २०२१ अंतर्गत रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मालेगाव व रॉयल हार्टेड ग्रुप नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक ते मालेगाव आणि मालेगाव-देवळा-सटाणा-कळवण या मार्गावर भव्य हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत सहभागी होणाऱ्या वाहन चालकांचा सत्कार समारंभ पोलीस परेड मैदानावर आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी जिल्हा न्यायाधीश ए.एस.गांधी, अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम, उप महापौर निलेश आहेर, प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण बिडकर, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्यासह परिवहन विभागातील अधिकारी, कर्मचारी व वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री भुसे म्हणाले, ग्रामीण भागात हेल्मेट वापराचे प्रमाण फार कमी आहे. त्यामुळे हेल्मेट वापराविषयी जनजागृती करण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यात अपघातांचे व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहन चालकांनी वेग मर्यादीत ठेवावा तसेच दुचाकी वाहन चालकांनी हेल्मेटचा व चारचाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा नियमीत वापर करावा असे आवाहनही मंत्री भुसे यांनी यावेळी केले.
प्रादेशिक परिवहन अधिकारी कळसकर यांनी मार्गदर्शन करतांना वाहतुक नियमांचे तसेच सुरक्षेचे महत्व विषद केले. यावेळी रॅलीत सहभागी झालेल्या वाहन चालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना माहिती पत्रके व पुस्तिकेचे वाटपही करण्यात आले. भव्य हेल्मेट रॅलीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी व मोटार ड्रायव्हींग स्कुलचे संचालक, वाहन वितरक, विमा प्रतिनिधी तसेचे कै. ठगुबाई शंकर देवरे सेवाभावी संस्था, सौंदाणे यांचे सहकार्य लाभले.