मालेगाव : स्थानिक प्रशासनात काम करीत असताना कायद्याच्या चौकटीत राहून व महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहून काम करावे लागते. काही व्यक्तींचे त्यांच्या आर्थिक अथवा राजकीय हिताचे काम प्रशासनास करता आले नाही तर वेगळ्या स्वरूपाचे आरोप त्यांच्याकडून होत असतात. शहरात काम करीत असताना आपण कोणताही भ्रष्टाचार केलेला नाही. जर भ्रष्टाचार केला असेल तर समोर येऊन अथवा सोशल मीडियाच्या माध्यमातून सिध्द करावा असे आवाहन मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी केले.
अविश्वास प्रस्तावावर चर्चा होण्याआधी आयुक्त कासार यांनी त्यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी आयुक्त कासार म्हणाले, मालेगाव महापालिकेचा आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर मालेगावातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा व रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मनापासून अहोरात्र काम केले. त्या काळात मालेगाव शहरातील धार्मिक व स्वयंसेवी संस्थांनी खूपच छान साथ दिल्यामुळे आपण कोरोनावर मात करू शकलो. यातूनच “मालेगाव पॅटर्न” तयार झाला.
माझ्यासह प्रशासन चांगले काम करीत असताना मागील आठ ते दहा दिवसापासून मालेगाव शहरात सोशल मीडियात माझ्याबद्दल खुपच बदनामी चालू आहे. माझ्यावर आग्रारोड, बायोमायनिंग, स्वच्छता कामाचे आऊटसोर्सिंग, घरपट्टी सर्व्हे, सौर ऊर्जा प्रकल्प, गिरणा पंपिंग मशिनरी दुरुस्ती ही कामे मी महापालिकेचे आर्थिक नुकसान करण्यासाठी तयार केली असे आरोप काही लोकप्रतिनिधींनी माझ्यावर केले आहेत. मात्र यातील बहुसंख्य कामांचे डॉकेट किंवा प्रस्ताव प्रशासनाने महासभेपुढे पाठविलेला नाही तर तो महासभेच्या सदस्यांच्या सूचनेनुसार तयार केलेला आहे व तो ठराव अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे पाठविलेला आहे. काही ठरावात तर टेंडरच्या अटी-शर्ती सुद्धा नमूद केलेल्या आहेत.
या ठरावानुसार प्रशासनाने निविदा मागविलेल्या आहेत व आलेल्या न्युनतम दरात सुद्धा प्रशासनाने वाटाघाटी केलेली आहे. त्यानुसार कमी केलेले दर स्थायी समितीकडे मान्यतेसाठी पाठविलेले आहेत. समितीने चर्चा करून मान्यता दिलेल्या कामांचीच फक्त वर्क ऑर्डर दिलेली आहे. यातील कोणत्याही कामाला अद्याप पाहतो एक रुपये अग्रिम दिलेला नाही.
गिरणा पंपिंग मशिनरी दुरुस्ती व २७.४० कोटीचा सौरऊर्जा प्रकल्प मला महापालिकेच्या आर्थिक हिताविरुद्ध वाटत असल्याने या कामाची मी वर्क ऑर्डर दिली नाही, तसेच मान्यतेसाठी सदर प्रस्ताव स्थायी समितीकडे हि पाठविले नसल्याचे आयुक्त कासार यांनी आरोपांना उत्तर देताना सांगितले. माझ्यावर आरोप करण्यात आलेली सर्व कामे ही महासभेच्या ठराव नुसारच मंजूर झालेली आहे. जर महासभेला ही कामे आता नको असतील तर महासभेने धोरणात्मक निर्णय घ्यावा. ही सर्व कामे आहे त्या स्थितीत थांबविण्यासाठी मी त्वरित कारवाई करण्यास तयार असल्याचे आयुक्त कासार यांनी यावेळी सांगितले.
कोरोना काळात मनपा प्रशासनाने अहोरात्र काम करून रुग्णांची सेवा केली आहे. चुकीच्या पद्धतीने मला अथवा प्रशासनाला कोणत्याही कामासाठी दबाव टाकण्यासाठी बदनाम करु नये, अशी विनंती आयुक्त कासार यांनी यावेळी केली. आरोग्याच्या कामासाठी मला वैद्यकीय रजेची आवश्यकता आहे. त्यासाठी मी शासनाकडून रजा मंजूर करून घेतली होती. मात्र शहरातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव व आयुक्तपदाचा कार्यभार घेणेस इतर कोणताही अधिकारी तयार होत नसल्याने मी शहराप्रती असलेल्या जबाबदारीतून आयुक्त म्हणून काम करत आहे. आपण सर्वांनी शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाविरूध्द लढण्यास प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त कासार यांनी केले.