नाशिक – मालेगावा मध्ये विक्रीसाठी आणलेल्या ४० तलवारी पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी जप्त केल्या आहे. या प्रकरणात मोहम्मद आसिफ शाकिर अहमद, इरफान अहमद हबीब अहमद, आतिक अहमद सलीम अहमद या तीघांना अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून तलवारी, अॅाटोरिक्षा, मोबाईल असा एकुण १ लाख ८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा हस्तगत झाल्याने खळबळ उडाली आहे.
शहरात तालवारींची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॅाटेलजवळच्या मोकळ्या जागेत सापळा रचून ही कारवाई केली. याप्रकरणी मालेगावच्या पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हयाचे पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत खांडवी यांच्या सुचनेनुसार पोलिस पथकातील पोलिस उपनिरीक्षक आर.के.घुगे, प्रकाश बनकर, भूषण खैरणार, पंकज भोये, संदीप राठोड यांनी ही कारवाई केली आहे.