मालेगाव – राज्याचे मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून बाजारामध्ये ज्या बाबींची मागणी असेल त्याच पध्दतीने शेतकऱ्यांनी पीक घ्याव. ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेचा भाग म्हणून आज मालेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील भाजीपाला थेट ग्राहकांसाठी शहरात विविध १३ ठिकाणी उपलब्ध करून दिला जात आहे. हा एक छोटासा प्रयोग असून मालेगाव तालुक्यातील हा प्रयोग यशस्वी झाल्यास संपूर्ण राज्यात तो राबविला जाईल. असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री ना.दादाजी भुसे यांनी आज केले.
कृषी विभागाच्या माध्यमातून शहरामध्ये १३ ठिकाणी भाजीपाला व फळे विक्री केंद्राचे उद्घाटन प्रसंगी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी उपमहापौर निलेश आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनिल देवरे, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप देवरे, तहसिलदार चंद्रजित राजपूत, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, नगरसेवक सखाराम घोडके, जयप्रकाश बच्छाव, कविता वाघ, राजाराम जाधव, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, गिरणाथडी शेतकरी उत्पादक कंपनीचे निळकंठ निकम, प्रमोद निकम, देवरे, प्रमोद शुक्ला, रामभाऊ मिस्तरी, कृषी विभागाचे तंत्र अधिकारी गोकुळ अहिरे, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना मंत्री श्री.भुसे म्हणाले ‘विकेल ते पिकेल’ या माध्यमातून शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील. एकंदरीतच यामागे शेतकऱ्यांची सर्वांगिण प्रगती व्हावी हे ध्येय आणि उध्दीष्ट आहे. हा एक प्रयोग असून या माध्यमातून ग्राहकांना दर्जेदार, ताजा भाजीपाला वाजवी दरामध्ये उपलब्ध होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
ही आहेत १३ ठिकाणे
मालेगाव शहरात भाजीपाला विक्री ही सटाणा नाका, डी.के.कॉर्नर जवळ, अरोमा थिएटर जवळ, दौलती हायस्कुल जवळ, कृषि नगर स्टॉपजवळ, साठ फुटी रोड डॉ.शरद पाटील यांचे हॉस्पीटलजवळ, चर्चगेट जवळ, मोतीबाग नाका, रावळगाव नाका, वर्धमान नगर प्रवेशव्दाराजवळ, दत्त मंदीर संगमेश्वर, निसर्ग चौक कलेक्टर पट्टा, जुने आर.टी.ओ.ऑफीस नामपूर रोड, या १३ ठिकाणी ठरविण्यात आलेली आहे. सदर ठिकाणी कृषि विभागाचा संत सावता माळी रयत बाजाराचा लोगो असलेली सात फुटी व्यासाची छत्री देण्यात आली असुन त्यठिकाणी भाजीपाला क्रेट्स, भाजीपाला माडणी, शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीकरिता देण्यात येणार असुन शेतकऱ्यांना या स्टॉलवरुन ताजा भाजीपाला थेट ग्राहकांना विक्री करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. भाजीपाला स्टॉलवर उपस्थित शेतकरी बांधवाना एक विशीष्ट पोशाख आणि ओळखपत्र राहणार आहे. कोवीड विषाणूच्या प्रादुर्भावाबाबत विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचेही उपविभागीय कृषी अधिकारी श्री.देवरे यांनी यावेळी सांगितले.
निळगव्हाण येथील स्मशानभुमी बैठक व्यवस्थेचे भूमीपूजन
मालेगाव तालुक्यातील निळगव्हाण येथे जनसुविधा योजनेतंर्गत स्मशानभुमी बैठक व्यवस्थेच्या कामाचे भुमीपूजन राज्याचे कृषी तथा माजी सैनिक कल्याण मंत्री ना.दादाजी भुसे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बंडू बच्छाव, सरपंच सुनिल सकट, उपसरपंच प्रिती पठाडे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, विस्तार अधिकारी महाले आदि उपस्थित होते. या भुमीपूजन प्रसंगी मंत्री श्री.भुसे यांनी जनसुविधा योजनेच्या मंजूर कामाचा दर्जा व गुणवत्तेमध्ये तडजोड खपवून घेणार नसल्याचे सांगत, ग्रामीण भागातील जनतेच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून त्यांना सर्व मुलभूत सुविधा देण्यासाठी शासन स्तरावरून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.