मालेगाव- राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार तालुक्यातील 99 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता पारदर्शीपणे कामकाज करावे असे निर्देश तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांनी दिले आहेत.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नायब तहसिलदार सोमनाथ खैरे यांच्यासह सर्व निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलतांना तहसिलदार श्री.राजपूत म्हणाले, राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे. यात मालेगाव तालुक्यातील ९९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीचे कामकाज करताना दाखल उमेदवारी अर्जांची काटेकोर छाननी करावी. यामध्ये उमेदवाराकडे असलेली थकबाकी, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, शैक्षणिक पात्रता, शौचालय, कुटूंब नियोजन, अतिक्रमण आदि बाबीची काटेकोर तपासणी करावी.
ग्रामपंचायतींमधील मागास प्रवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशा सर्व मागासवर्गीय उमेदवारांची नामनिर्देशन अर्जासमवेत समितीकडे जाती दावा प्रस्ताव सादर केल्याची पोहोच पावती विहीत मुदतीत सादर करता येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नामनिर्देशनपत्रासोबत आवश्यक ते सर्व स्वयंघोषणापत्र हे नोटरी किंवा सेतू शिक्का नसेल, तरी चालणार असल्याचेही त्यांनी सांगितले.