मालेगाव- खरे शिवराय समजून घेणे आवश्यक आहे. चूकीचे शिवराय आमच्या डोक्यात भरवले गेलेत. जात धर्माच्या पलीकडचा शिवरायांचा विचार समजून घेऊ या. माणूस जोडण्याचे काम आपल्याला करायचे आहे. मालेगाव याबाबत खूप अग्रेसर आहे. मालेगावात असलेले धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक ऐक्य हे येथील वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. अर्जुन कोकाटे यांनी केले.
राष्ट्र सेवा दल मालेगाव आयोजित अभिनव शिव उत्सवात प्रा. कोकाटे बोलत होते. कोकाटे यांनी असे ही सांगितले की उर्दू भाषिक मुलींना ऐकण्यासाठी इतर भाषिक मोठ्या संख्येने येतात तेव्हा भाषिक एकता सामाजिक एकता दिसून येते. मालेगावाचे हेच वैशिष्ट्य आहे. यावेळी नाशिक जिल्हा राष्ट्र सेवा दल कार्याध्यक्ष दिनकर दाणी, महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, जावीद अहमद मंचावर उपस्थित होते. प्रा. कोकाटे पुढे म्हणाले, समाजातील प्रत्येक घटक जोडुन घेऊ या. समताधिष्ठित समाज निर्माण व्हावा. यासाठी सेवा दलाच्या माध्यमातून कार्य हाती घेतले जाईल.
यावेळी शिवछत्रपती महाराजांच्या चित्र प्रदर्शनाची मांडणी करण्यात आली होती. आफरीन गुफरान व मुकर्रमीन मुस्तफा या उर्दू भाषिक विद्यार्थिनींनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले. या दोन्ही विद्यार्थिनींचा सेवा दला तर्फे सत्कार करण्यात आला. अर्जुन कोकाटे यांची राष्ट्र सेवा दल महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी निवड झालेबद्दल त्यांचा मालेगाव केंद्रा तर्फे जेष्ठ सेवा दल सैनिक सुनील वडगे व जावीद अहमद यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राष्ट्र सेवा दल मालेगाव तर्फे आयोजित निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. प्रास्ताविक नचिकेत कोळपकर यांनी तर रविराज सोनार यांनी आभार मानले. साधना वाचनालय संगमेश्वर येथे आयोजित या कार्यक्रमात यावेळी तालुकाध्यक्ष सुधीर साळुंखे, राजेंद्र दिघे, प्रवीण वाणी, राजीव वडगे, अॅड सोमदत्त मुंजवाडकर, बापू जाधव, काशिनाथ डोईफोडे, अॅड मनोज चव्हाण, सोहेल डालरीया, स्वाती वाणी, बळवंत अहिरे, योगेश देशावरे, संतोष करंजकर, संजय निकम यांचेसह सेवा दल सैनिक उपस्थित होते.
————–
निबंध स्पर्धा विजेते :
प्राथमिक गट: प्रथम: यज्ञेश बोरसे
द्वितीय: अंजली जाधव, तृतीय:आदीती तागडे
माध्यमिक गट: प्रथम: निर्जला पगारे., द्वितीय:तेजस्विनी पगारे, तृतीय: यशश्री चौधरी.
स्पर्धेचे परिक्षण कविता मंडळ यांनी केले.