नाशिक : पार्क केलेली मालवाहू पिकअप वाहन पळवून नेणा-या दोघा चोरट्यांना गंगापूर पोलीसांनी जेरबंद केले. संशयीताच्या ताब्यातून पिकअप हस्तगत करण्यात आली असून याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीष उर्फ गणेश बारकू शिंदे (रा.भुत्याने ता.चांदवड) व पंढरीनाथ उर्फ विशाल नामदेव घनगाव (रा.सातपूर) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. महात्मानगर भागातून गेल्या शनिवारी (दि.१२) रात्री पिकअप एमएच ४८ टी १६९१ चोरीस गेली होती. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस चोरट्यांच्या मागावर असता पिकअप वाहन पिंपळगाव टोलनाक्यावरून पुढे गेल्याचे समोर आले. पोलीस त्या दिशेने तपास करीत असतांना उपनिरीक्षक सचिन शेंडकर यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. घनगाव याने वाहन चोरून त्याच्या मामाचा मुलगा गणेश शिंदे याच्याकडे वाहन विक्री करण्यासाठी दिल्याचे माहिती पोलीसांना मिळाली.पोलीसांनी भुताणे गाव गाठून शोध घेतला असता संशयीत मिळून आला नाही. पोलीस तपासात तो सोमवारी (दि.१४) चांदवड येथील बाजारात गेल्याचे निष्पन्न झाले. पोलीसांनी चांदवड गाठले असता पाठलाग करून शिंदे यास जेरबंद करण्यात आले. तर घनगाव यास कामगारनगर (सातपूर) येथे अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून पिकअप हस्तगत करण्यात आली आहे. ही कामगीरी वरिष्ठ निरीक्षक अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेंडकर,हवालदार दिगंबर मोरे,पोलीस नाईक निलेश पवार,रविंद्र मोहिते,गिरीष महाले शिपाई दीपक जगताप,घनश्याम भोये,तुषार देसले व गणेश हिंंडे आदींच्या पथकाने केली.