नाशिक : पैसे घेण्यासाठी मालकाची वाट बघत उभ्या असलेल्या चालकास मारहाण करीत चार जणांच्या टोळीने दारूने भरलेला मालट्रक पळवून नेल्याची घटना शहरातील इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागात घडली. या घटनेत मालट्रकसह तब्बल दीड कोटी रूपयांचा दारू साठा पळविला असून याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात जबरीलूट आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगदिश संपत बोरकर (३७ रा.राजवाडा,विल्होळी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोरकर हे (एमएच ४८ बीएम १६१०) या मालट्रक वरील चालक असून त्यांच्या मालकाचा मद्यवाहतूकीचा व्यवसाय असल्याने ते सोमवारी (दि.१८) सायंकाळच्या सुमारास दिंडोरी येथे गेले होते. मध्यरात्री दिंडोरी तालूक्यातील सिग्राम – पेरनॉड रिकॉर्ड इंडिया लि. या कारखान्यातून ते आपल्या आयशर ट्रक मध्ये मद्यसाठा भरून पनवेल (मुंबई) येथे पोहच करण्यासाठी निघाले असता ही घटना घडली. रात्री अडिच वाजेच्या सुमारास प्रवास खर्चासाठी ते मालकाची वाट बघत इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे आपल्या वाहनासह थांबले असता लुटमारीचा प्रकार घडला. अज्ञात चार जणांच्या टोळक्याने त्यांना गाठून जबरदस्तीने वाहनाचा ताबा घेतला. या वेळी टोळक्याने चालकास मारहाण करीत चालकाच्या कॅबीनमध्ये डांबून ठेवत मालट्रक महामार्गावरून पळवून नेला. चांदवडनजीक चालक बोरकर यांना बेदम मारहाण करीत टोळक्याने त्यांना वाहनातून खाली उतरवून देत धुळयाच्या दिशेने पळवून नेला. आयशर ट्रक मध्ये १ कोटी ४३ लाख ३८ हजार ६१० रूपये किमतीचा मद्यसाठा होता. बरकर यांनी मंगळवारी सकाळी कसेबसे मुंबई नाका पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली असून अधिक तपास चेतन श्रीवंत करीत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वीच निफाड तालूक्यात मद्याचे ट्रक पळविण्याचे प्रकार समोर आले होते. त्यापाठोपाठ ही घटना घडल्याने मद्यचोरट्यांची टोळीच कार्यरत असल्याचे बोलले जात असून,मुंबई नाका पोलीसांनी वेगवेगळी पथके तयार करून कसमादे पट्यासह मालेगाव – धुळे येथे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.