मुंबई – मालगाडीच्या वॅगनमध्ये राहून जाणारा कचरा किंवा वस्तू आता रेल्वेसाठी कमाईचे साधन ठरणार आहे. आतापर्यंत रेल्वे प्रशासन स्वतःच्या खर्चाने या डब्यांची साफसफाई करायचे. मात्र आता याच डब्यांमधील कचऱ्याचे प्रशासनाला ५० रुपये मिळतील आणि स्वच्छताही विनाशुल्क करून मिळेल.
पश्चिम मध्य रेल्वेने एका खासगी कंपनीसोबत करार केला आहे. कटनी आणि आसपासच्या यार्डात येणाऱ्या मालगाड्यांच्या संख्येच्या आधारावर अधिकाऱ्यांनी अंदाज लावला आहे की या कामातून रेल्वेला वर्षाला १८ कोटी रुपये मिळू शकतात. पश्चिम-मध्य रेल्वे झोनमध्ये येणारे कटनी जंक्शन आणि त्याच्या आसपासच्या स्थानकांच्या यार्डात मालगाड्यांची साफसफाई करणे सर्वांत मोठे आव्हान ठरत असते. येथे दररोज कोळसा, सीमेंटसह इतर माल उतरविण्यासाठी गाड्या येत असतात. त्यानंतर वॅगनची साफसफाई केली जाते. आतापर्यंत रेल्वे प्रशासन ज्या ठेकेदारांवर जबाबदारी सोपवायचे त्यांचे मजूर कचरा घेऊन जाताना ट्रॅकजवळच पाडून ठेवायचे. मात्र आता असे होणार नाही. रेल्वेने एक प्रस्ताव तयार करून साफसफाईचे कंत्राट खासगी कंपनीला देण्यासाठी निविदा आमंत्रित केल्या होत्या. निविदांच्या पडताळणीनंतर रेल्वे प्रशासनाने सफासफाईची जबाबदारी एका खासगी कंपनीला सोपवून सामंजस्य करार केला. आता या कंपनीचे मजूर साफसफाईनंतर कचरा आपल्या सोबत घेऊन जातील. प्रत्येक वॅगनच्या मागे रेल्वेला ५० रुपये मिळतील व निःशुल्क सफाईदेखील करून मिळेल. रेल्वे प्रशासन कचऱ्यातून कमाई करण्याचा हा पहिलाच प्रसंग ठरणार आहे.
निगराणीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे
रेल्वे प्रशासनाच्या वतीने खासगी कंपनीसोबत करार करण्यात आल्याने केवळ वॅगनच्या साफसफाईचे टेंशन दूर झालेले नाही तर ट्रॅकवर कचरा पडून राहणे, सफाईनंतर दवाजा बंद करणे या कटकटींपासूनही सुटका झालेली आहे. सीसीटीव्हीच्या निगराणीत हे काम होईल आणि कॅमेराचा खर्चही खासगी कंपनीच करेल.