‘मार्कोस’ कमांडो लडाखमध्ये काय करतायत?
नौदलाचे कमांडोदल ‘मार्कोस’ लडाखमध्ये दाखल झाल्याची बातमी आज अनेक वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केली आहे. पण ‘मार्कोस’ लडाखमध्ये आता दाखल झालेले नाहीत, ते तेथे जूनपासून आहेत. गलवान घटनेनंतर तिन्ही दलांचे कमांडोदल लडाखमध्ये काम करीत आहेत.
‘मार्कोस’ची तेथील उपस्थिती ही पँगाँग आणि स्पँगूर सरोवराच्या संदर्भात आहे. विशेषत फिंगर परिसरात सरोवरातून कारवाई करायची झाल्यास ‘मार्कोस’ मार्फत ती करणे सोयीचे आहे. आता पँगाँग सरोवर गोठलेले आहे. आणखी एका महिन्यानंतर ते दगडासारखे टणक होईल, तेव्हा फिंगर आठवरील चिनी तळावर कारवाई करणे सोपे जाईल. या भागात आता किमान तापमान उणे १५ अंशापर्यंत गेले आहे. ते आता १५ दिवसांत उणे तीसपर्यंत जाऊ शकते. त्यानंतर तेथे मानवी वस्ती अवघड होते. चिनी सैनिकांनी या वातावरणापासून बचाव करणारे निवारे बांधले आहेत. भारतीय सैनिकांवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सॉर्सही बसवले आहेत. या सेन्सॉर्समुळे या थंडीरोधक निवाऱ्यांमध्ये बसून चिनी सैनिकांना भारतीय सैनिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवता येईल. पण या भागात ‘मार्कोस’ कमांडो तैनात केल्यानंतर चिनी सैनिकांना या सेन्सॉर्सवर भरोसा ठेवून स्वस्थ बसता येणार नाही. त्यांना सतत उघड्यावर येऊन गस्त घालावी लागेल. कारण ‘मार्कोस’ कमांडो सेन्सॉर्सना चकवा देऊन किवा ते निकामी करून चिनी तळावर कारवाई करू शकतात.
डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात चिनी सैनिकांना त्यांच्या थंडीरोधक उबदार निवाऱ्यांमध्ये स्वस्थ बसू द्यायचे नाही व त्यांना लडाखची गारेगार हवा चाखायला भाग पाडायचे असे डावपेच भारतीय सैनिकांचे दिसतात. चिनी लष्कराने आपल्या सैन्यासाठी देशातच गरम पोशाख तयार केले आहेत. पण हे पोशाख लडाखच्या थंडीत फारसे उपयुक्त नसल्याचे वृत्त ‘तैवान टाइम्स’ने नुकतेच दिले आहे. हे पोशाख ९ हजार फूट उंचीपर्यंत उपयुक्त आहेत पण लडाखमध्ये सरासरी उंची ही १२ हजार फूट आहे व तेथे हे पोशाख थंडीपासून बचाव करू शकत नाहीत. त्यामुळे दररोज किमान एक चिनी सैनिक मरण पावत असल्याचे ‘तैवान टाइम्स’ने म्हटले आहे. याचा अर्थ किमान २०-२५ चिनी सैनिक तरी आजारी पडून त्यांना इस्पितळात दाखल करावे लागत असणार.
भारतीय सैनिकांसाठी अमेरिकेतून खास थंडीरोधक पोशाख आयात केले आहेत व ते एवढ्या उंचीवर खूप परिणामकारक आहेत. या ठिकाणी भारतीय सैनिकही आजारी पडत असतात, पण त्यासाठी अगदी जवळच खास उपचारांच्या सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. असे रुग्ण हाताळण्याचा भारतीय लष्कराच्या डॉक्टरांना चांगला अनुभव आहे. सियाचीनमधील अशा मृत्यूचे प्रमाण जवळपास शून्यावर आणण्यात भारतीय लष्कराने यश मिळवले आहे, त्यामुळे लडाखमध्ये भारतीय सैन्याला फार मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल असे वाटत नाही. त्यामुळेच तेथील थंडीत चिनी सैनिकांना उबदार निवाऱ्यांचा फार लाभ घेता येईल असेही वाटत नाही.
दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याच्या प्रस्तावावर अद्याप काहीच निर्णय घेतला नाही. या थंडीच्या काळात असा निर्णय झाला नाही तरी भारतीय सैन्याचे फारसे काही बिघडणार नाही. भारताने कैलास रेंजच्या शिखरावरून सैन्य मागे घेण्यास अद्याप होकार दिलेला नाही व तशी शक्यताही कमी आहे. त्यामुळे या प्रस्तावावर फार काही घडण्याची शक्यता कमी आहे. अर्थात कोअर कमांडर पातळीवरील चर्चेची नववी फेरी अद्याप बाकी आहे. चीनला या बैठकीची आवश्यकता वाटली तर ती होईल अन्यथा स्थिती आहे तशीच राहील.