नाशिक – भगूर येथील चंद्रभागाबाई किसन करंजकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र तथा शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर आणि करंजकर परिवाराने भजन व प्रवचनादी कार्यक्रमाबरोबरच मातृस्मृतींना ‘काव्यांजली’ तून अनोख्या पद्धतीने उजाळा दिला.
हा अनोखा कार्यक्रम सुप्रसिद्ध कवी रवींद्र मालुंजकर, गीतकार राजेंद्र सोमवंशी आणि युवकवी प्रशांत केंदळे यांनी सादर केला. धर्म आणि कर्मावर विश्वास असणाऱ्या चंद्रभागाबाई यांच्या निधनानंतर घरी जमा झालेला मोठा गोतावळा आणि भगूरवासीयांसाठी आईच्या कवितांची ही अनोखी मैफल संपन्न झाली.
कवी रवींद्र मालुंजकर यांनी ‘आई भक्तीचा सागर, जणू विठ्ठल माऊली, तिच्या कृपाप्रसादाची, नाही लोपली साऊली…’ या कवितेद्वारे आईची महती विशद केली. कवी विजयकुमार मिठे यांची ‘जव्हा आठवते आई’ , काशीनाथ वेलदोडे यांची ‘माय माझी’, देवानंद पवार यांची ‘मह्या मायचं चित्रांग’, प्रा.राजेश्वर शेळके यांची ‘बूट आणि टाय’ या कविता सादर केल्या. कवी राजेंद्र सोमवंशी यांनी ‘दिस उलटून जातो, होते सांज नवलाई, होई सावली काळोख, तेव्हा आठवते आई’ या स्वरचित कवितेबरोबर कवी ग्रेस यांची ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’, कवी इंद्रजित भालेराव यांची ‘हे राष्ट्रमाते आई जिजाऊ’ या रचना सादर केल्या.
युवाकवी प्रशांत केंदळे यांनी ‘माय अमृताचा घडा, माय प्राजक्ताचा सडा, माय रोज शिकविते, मला जीवनाचा धडा…’ या स्वरचित कवितेबरोबर कवी सुरेश भट यांची ‘गे मायभू तुझे मी, फेडीन पांग सारे’ आणि कवी फ.मुं.शिंदे यांची ‘आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं…’ अशा आईची महती गाणाऱ्या कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या प्रारंभापासून अखेरपर्यंत भावविभोर कवितांनी सर्वांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. कोरोनामुळे सुमारे दोन ते अडीच हजार रसिकांनी फेसबुक लाईव्हवरती कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी नगरसेवक संग्राम करंजकर आणि प्रशांत धिवंदे यांनी परिश्रम घेतले.