नाशिक – त्र्यंबकरोडवरील मायको सर्कलकडून दररोज जाणाऱ्या वाहनधारकांसाठी मोठी खुषखबर आहे. या सर्कलच्या ठिकाणी प्रस्तावित असलेल्या उड्डाणपुलाचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. या सर्वेक्षणानंतर या पुलाचे काम प्रत्यक्षात सुरू होणार आहे.
त्र्यंबकरोडवरील मायको सर्कल हा रहदारी आणि वाहतूक कोंडीचा मोठा चौक आहे. याठिकाणी तब्बल ८ ते ९ रस्ते येऊन मिळतात. त्यामुळे येथे उड्डाणपुल करण्याचे प्रस्तावित आहे. सिडको, उंटवाडीकडे जाणाऱ्यांसाठी तसेच त्र्यंबकरोडला जाणाऱ्यासाठी अशा प्रकारचा वाय आकाराचा हा उड्डाणपुल असणार आहे. स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे असताना या उड्डाणपुलाचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे देण्यात आला. त्यानुसार या उड्डाणपुलाचे तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. खासगी कंपनीला हे काम देण्यात आले आहे. या कंपनीकडून सध्या काम सुरू असून त्यासंबंधीचे फलकही कंपनीने रस्त्याच्याकडे लावले आहेत. हे सर्वेक्षण झाल्यानंतर त्याचा अहवाल सादर होणार आहे. त्यानंतर या पुलासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. त्यासाठी निविदा मागविल्या जातील आणि मग हे काम सुरू होणार आहे. या उड्डाणपुलामुळे या सर्कलच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी दूर होणार आहे.