नाशिक – हल्ली मोठ्या प्रमाणात समाजात नैराश्य असल्याचे दिसून येत आहे. याच अनुषंगाने जागतिक मानसिक दिनाचे औचित्य साधून नाशिक सायकॅट्रिक सोसायटी यांचेतर्फे मनमंथन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १० ते १७ ऑक्टोबर दरम्यान मानसोपचारतज्ञ निरनिराळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे.
व्याख्यानमालेचे उद्घाटन आयपीएस वेस्ट झोनचे अध्यक्ष डॉ. लक्ष्मीकांत राठी आणि आयपीएस वेस्ट झोन चे सेक्रेटरी डॉ. धनंजय अष्टुरकर यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले. ‘समाज माध्यमे, एक नवीन व्यसन?’ या विषयावर सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. उमेश नागापूरकर यांनी मार्गदर्शन केले. वैज्ञानिक प्रगतीबरोबरच समाज माध्यमाच्या स्वरूपामध्ये एक संवादाचे आणि माहिती मिळवण्याचे नवीन माध्यम हाती लागले. पण विज्ञान शाप की वरदान अशी आज अवस्था झालेली आहे, प्रत्येक चित्रपटात नायका बरोबर खलनायकही असतो तसेच समाज माध्यमांची मानवी जीवनातील भूमिका ही नायक की खलनायक म्हणावी इतपर्यंत समाज माध्यमांचे व्यसन आता मानवी जीवनावर परिणाम करत असल्याचे ते म्हणाले. सकाळी उठल्यापासून मोबाईल हातात घेऊन प्रत्येक गोष्टसाठी समाज माध्यमांद्वारे आपण इतरांशी कनेक्ट होऊ पाहतो आणि दिवसातला जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवतो. याला व्यसनच म्हणायचे आणि कोणतेही व्यसन म्हंटलं की हा एक मानसिक आजार म्हणून आपण त्याकडे पाहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. लहान मुलांच्या मानसिकतेत समाज माध्यमाच्या अतिवापरामुळे दुष्परिणाम आढळून येत आहेत असेही ते म्हणाले.
पहिल्या सत्रासाठी अध्यक्ष म्हणून मानसोपचारतज्ञ डॉ. जयंत ढाके व सूत्रधार म्हणून मानसोपचारतज्ञ डॉ. महेश भिरुड यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचा पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी इंडियन सायकॅट्रिक सोसायटीच्या नाशिक शाखेच्या यूट्यूब चॅनलला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.पुढचे आठ दिवस रोज रात्री आठ वाजता विविध विषयांवर मानसोपचारतज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.