नवी दिल्ली – ‘डान्स दिवाने ३’ या रिऍलिटी शो मध्ये अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेने परीक्षकाच्या भूमिकेत आहे. सध्या यात होळी निमित्त विशेष भागाचे चित्रीकरण सुरू आहे. यासाठी जुन्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री या सेटवर आल्या होत्या. या दिग्गज अभिनेत्रींसोबत ठुमके घेण्याचा मोह माधुरीलाही आवरता आला नाही.
या तीन अभिनेत्री आहेत वहिदा रहमान, आशा पारेख आणि हेलन. पाहुण्या कलाकार म्हणून त्या या सेटवर येणार आहेत. या भागातील अनेक मोमेंट्स माधुरीने आपल्या इन्स्टा अकाऊंटवरून शेअर केल्या आहेत. स्पर्धक या तिघींची गाणी सादर करतील तर या तिघींच्या गाण्यांवर त्यांच्यासह माधुरी देखील डान्स करताना दिसेल.
वहिदा रहमान यांनी ‘पान खाये सैया हमारे’, आशा पारेख यांनी ‘अच्छा तो हम चलते है’, तर हेलन यांनी ‘मुंगडा’ या गाण्यावर परफॉर्म केले. भलेही या तिघीनी आपापल्या जागेवर बसूनच सादरीकरण केले असले, तरी या गाण्यावरचे त्यांचे एक्सप्रेशन एकदम लाजवाब होते. म्हणूनच हे व्हिडीओ वारंवार पाहिले जात आहेत. सोशल मोडियावरही हे व्हिडीओ असून ते जबरदस्त व्हायरल होत आहेत. चाहते देखील यावर सतत कॉमेंट्स करत आहेत.