सौ. सुनिता चंद्रकांत म्हात्रे, मु. रांजणखार, पो. नारंगी, ता. अलिबाग, जि. रायगड या त्यांच्या परिवारासोबत मुंबईमध्ये बोरिवली येथे राहणाऱ्या गृहिणी. मुंबईमध्ये करोनामुळे झालेला हाहा:कार सर्वश्रुत आहेच. सौ.म्हात्रे यांनी सुद्धा मुंबईत बंदच्या काळात जवळजवळ ५० दिवस घरामध्येच काढले. परंतु जीवनावश्यक वस्तूंसाठी कधीतरी बाजारात जावे लागत होते आणि त्यांना नकळतच काेरोनाची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली. मात्र त्यांना स्वत:ला काेरोनाची लागण झाली असेल, याची पुसटशी देखील कल्पना नव्हती.
- मनोज सानप
सौ. सुनिता चंद्रकांत म्हात्रे अलिबाग जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यावर आलेला अनुभव अत्यंत वेगळा होता. बहुतांश लोकांचे सरकारी दवाखान्याबाबत खूप वाईट अनुभव,वाईट मते असतात. परंतु सौ.म्हात्रे त्यांचा अलिबाग येथील शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतरचा अनुभव सांगताना म्हणाल्या, आम्ही ज्या वार्डमध्ये होतो तेथील अनुभव आमच्यासाठी अनपेक्षित होता. सर्व परिचारिका, यात प्रामुख्याने सौ. तृप्ती म्हात्रे, अनुजा घरत, प्रज्ञा चौगुले, श्रुती जाधव, चैताली वाघमारे तसेच डॉक्टर्स व वार्ड बॉय उत्तम प्रकारे सेवा देत होते. कोणत्याही प्रकारचे ओरडणे नाही की खेकसणे नाही. तेथे औषधोपचारासोबत जेवणाची व्यवस्थासुध्दा मोफत होती. बाथरूमसुद्धा स्वच्छ होते. हे सर्व अनपेक्षित होते. काही दिवसातच आम्ही सर्व म्हणजे माझ्या ९० वर्षांच्या सासऱ्यांसहित आम्ही चौघेही पूर्णपणे काेरोनामुक्त होऊन सुखरूप घरी परतलो.
अनुभव कथन करीत त्या पुढे म्हणाल्या की, काेरोना आणि सरकारी रुग्णालयाबद्दलचा जनमानसात प्रचंड गैरसमज आहे. तो दूर व्हायला पाहिजे. मी काेरोनाबधित आढळल्यानंतर आमच्या परिवाराकडे पाहण्याचा शेजारी आणि नातेवाईकांचा दृष्टीकोन बदलला होता. जो तो आम्हाला अस्पृश्य असल्यासारखी वागणूक देत होता. क्वारंनटाईन केल्यानंतर कोणत्याही प्रकारची मदत करण्यास कोणीही तयार नव्हते तसेच जो कोणी मदत करेल त्याचीही अडवणूक केली जायची. पिण्यासाठी पाणीसुद्धा मिळत नसल्याने टँकर मागविला असता शेजाऱ्यांनी त्यासदेखील विरोध केला. किराणा सामान आणायचे कसे हा प्रश्न उभा राहिला. मात्र या परिस्थितीतही स्थानिक प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करुन माझ्या सारख्या अनेकांना वेळीच मदत करुन शासन किंवा शासकीय अधिकारी काहीच करीत नाहीत, हा गैरसमज दूर केला. आधी काेरोनाचे संकट व नंतरचे निसर्ग चक्रीवादळाचे संकट, या दोन्ही संकटात पालकमंत्री कु.आदिती तटकरे, इतर लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन या सर्वांनीच रायगडकरांची घेतलेली काळजी, त्यांना मदत मिळण्यासाठी केलेले अहोरात्र प्रयत्न याला तोड नाही.
लोक काहीही म्हणो…. परंतु मला स्वत:ला या काळात जो अनुभव आला, त्या अनुभवांती मी सौ. सुनिता चंद्रकांत म्हात्रे, मु. रांजणखार, पो. नारंगी, ता.अलिबाग शासनाचे त्यांनी पुरविलेल्या सोयी-सुविधांबद्दल, शासन करीत असलेल्या कामाबद्दल शतश: आभार मानते.
(जिल्हा माहिती अधिकारी, रायगड-अलिबाग)
(साभार – महासंवाद)