नाशिक – प्रसुतीदरम्यान मृत्यू झालेल्या मातेच्या बाळाला कुपोषणातून बाहेर काढण्यात यश आले आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि आशा वर्कर यांच्या माध्यमातून आणि सोशल नेटवर्किंग फोरम कुपोषण निर्मुलन मोहिमेमुळे हे शक्य झाले आहे.
गेल्या महिन्यात महिन्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मिलनवाडी या गावात प्रसूती दरम्यान लंका शीद या मातेचा मृत्यू झाला होता. जन्माला आलेले बाळाचे वजनही खूप कमी असल्याने तेही धोक्याच्या स्थितीत होते. हे गाव सोशल नेटवर्किंग फोरम या संस्थेच्या कुपोषण निर्मूलन मोहिमेअंतर्गत येते. मातेच्या मृत्यूची आणि बाळाच्या गंभीर प्रकृतीची माहिती कळताच फोरमचे अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी बाळाला वाचवायचे ठरवले. त्यानुसार नाशिकचे प्रख्यात बालरोगतज्ञ डॉ. अमित पाटील यांना दाखवण्यात आले. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे त्वरित हालचाली करत २६ ऑगस्ट रोजी बाळाला मविप्र मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटला ऍडमिट केले गेले.
शीद कुटुंबियांची परिस्थिती अगदीच बेताची असल्याने दरम्यानच्या काळातील खर्च फोरमच्या वैद्यकीय फंड मधून करण्यात आला. यासोबत फोरमच्या सदस्या स्मिता चौधरी यांनी कपडे, दुधाची बॉटल, मच्छरदाणी, स्वेटर, बेबी सोप, पावडर इत्यादी साहित्य आणून दिले. हॉस्पिटलमधील डॉक्टर्स, स्टाफ आणि फोरमच्या सदस्यांनी अथक मेहनत आणि काळजी घेतली. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आज आपणास कळविण्यास अतिशय आनंद होतोय कि आपल्या टीमला बाळाला धोक्याच्या स्थितीतून बाहेर काढण्यात यश आले आहे.
या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान फोरमचे वैद्यकीय विंगचे प्रमुख डॉ. पंकज भदाणे यांनी सर्व डॉक्टर्ससोबत समन्वय साधून योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. डॉ. अमित पाटील, मविप्र हॉस्पिटलचे डॉ. रवींद्र सोनवणे यांनी एकही रुपया न घेता अत्यंत महत्वाचे योगदान दिले.
स्मिता चौधरी यांनी योग्य वेळी योग्य साहित्याची मदत केली. मिलनवाडीच्या सरपंच भीमाबाई सराई, ग्रामपंचायत सदस्य, आशा कार्यकर्ती यमुना पारधी, अंगणवाडी ताई योगिता भगत, फोरमचे कार्यवाह संदिप डगळे यांनीही बाळाला नाशिकला आणणे, घेऊन जाणे यासाठी मोलाचे सहकार्य केले.