नाशिक – पावसाच्या ओढीमुळे जिल्ह्यातील पाण्याची चिंता वाढली असतानाच नांदगाव तालुक्यातून एक दिलासादायक बाब समोर आली आहे. नांदगाव तालुक्यातील अनेक गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेले माणिकपुंज धरण पूर्ण भरल्याने ते ओव्हरफ्लो झाले आहे. तब्बल आठ वर्षांनंतर हे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात ओव्हरफ्लो झालेले हे पहिलेच धरण आहे.
माणिकपुंज धरणाची क्षमता ३३५ दशलक्ष घनफूट एवढी आहे. सध्या धरणातून ९०० क्युसेक एवढा विसर्ग केला जात असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. खास म्हणजे, गेल्या वर्षी या धरणात ऑगस्टच्या प्रारंभी शून्य टक्के साठा होता. गेल्या काही दिवसांपासून नांदगाव परिसरात सलग पाऊस होत आहे. त्यामुळे माणिकपुंज धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे परिसरातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा तर हजारो हेक्टर शेतीच्या सिंचनाचा प्रश्न सुटल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.