माणसांच्या अंत:स्थ मनाची तरल कविता लिहिणारा कवी : संजय चौधरी
प्रत्येक व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. जीवनाच्या जडणघडणीतून, संस्कारातून सभोवतालाकडे बघण्याची त्याची दृष्टी तयार होते. त्यानुसार त्याचा स्वत:चा दृष्टीकोन तयार होत असतो. कलावंत ,साहित्यिक आणि सर्वसामान्य व्यक्ती, या प्रत्येकाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा असतो. त्याचप्रमाणे अनुभव घेण्याची दृष्टीही वेगळी असते. म्हणूनच सारेच साहित्यिक बनत नाही. लेखक किंवा कवीमनाचा माणूस या सृष्टीकडे वेगळ्या जाणिवेतून पाहत असतो. सामान्य माणूस मात्र व्यवहारी दृष्टीतून पाहतो. साहित्यिक त्या वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या उपयुक्ततेपेक्षा सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न करत असतो. जे सौंदर्य त्याच्या मनावर मोहिनी घालते, ते तो सत्यसृष्टीत उरतरून स्वतःचे कल्पनाविश्व उभे करतो. माणसाच्या मनाची रचना, जडणघडण ही अतिशय क्लिष्ट आहे. किंबहुना मन हे एक न उलगडलेले कोडे आहे. असे असतानाही मनाच्या अंतररंगापर्यंत जाऊन भिडण्याचे सामर्थ्य साहित्यिकात असते. उदाहरणार्थ ‘कवितेला येईल लहान मुलांच्या ओठांसारखा ताज्या दुधाचा वास’ किंवा ‘विस्कटलेले जावळ भुरभुरेल ओळीओळीत’. ‘ लपेट तुझी इवली नाचरी बोटं माझ्या बोटाभोवती… हीच तर जगातली सगळ्यात मौल्यवान अंगठी’ हे फक्त संवेदनशील मनाचा कवीच जाणू शकतो.
वास्तव हा साहित्याचा खरा पाया असतो. समाजातील सभोवतालच्या विश्वाचे निरीक्षण कवी करत राहतो. त्याआधारे तो त्याच्या कल्पनेचे विश्व निर्माण करतो. जणू प्रतिसृष्टीच निर्माण करतो.म्हणून तो त्या विश्वाचा निर्माता ठरतो. आणि त्याने निर्माण केलेले साहित्य ही कलाकृती ठरत असते. अर्थात ही कलाकृती वास्तव जीवनातूनच आकाराला येत असते. त्याच्या कल्पनाशक्तीलाच प्रतिभा असे म्हणतात. काहीजण प्रतिभेचा एक घटक म्हणून कल्पनाशक्तीचा उल्लेख करतात. प्रतिभा आणि अभिरूची यासाठी कल्पनाशक्तीची जरुरी असते. घटकांची निवड कल्पनाशक्ती अशाप्रकारे करते की कलाकृतीत दडलेले भावनांतर्गत मूल्य ती व्यक्त करते. भावनांची तीव्रता आणि सखोलता यांची जाण ठेवून कल्पनाशक्ती कार्य करत असते. त्यावेळी मात्र चमत्कृतीची पातळी तिला प्राप्त होते. भावनांचा आविष्कार करण्यासाठी कल्पनाशक्तीची आवश्यकता असते. ती नेहमीच भावनांशी साहचर्य साधत असते. भावनेची खोली जर अधिक असेल तर निश्चितपणे तेथे कल्पनाशक्ती उच्चदर्जाची ठरते. भावना जागृती करणे, भावना सहचार्य ठेवणे आणि कला वस्तूचा भाष्यकार होणे ही साहित्यातील कल्पनाशक्तीची महत्त्वाची असतात. कलाकृतीची नवनिर्मिती आणि आस्वाद खऱ्या अर्थाने घ्यायचा असेल तर कल्पनाशक्ती ही असायलाच पाहिजे. एखादा अनुभव जेव्हा ललित साहित्यकृतीच्या रूपाने प्रकट होण्यासाठी धडपडतो तेव्हा त्याची प्रचिती येणे अवघड असते. तेव्हा मात्र शब्दरुपाची स्वतंत्र जाणीव कविला होत असते. साहित्यकृतीतून लेखकाच्या जीवनातील जीवनानुभव कळत नकळत उतरत असतात. पाझरत असतात. त्याच्या साहित्यकृतीतून व्यक्त होणारा अनुभव चैतन्यमय रसरशीत असतो. त्यातून जीवनाचा साक्षात्कार होतो. त्या अनुभवात विविधतेबरोबरच अनेकपदरीपणा
असतो. प्रत्येक साहित्यकृती सेंद्रिय असते. साहित्यकृतीची भाषा जीवशास्त्रीय स्वरूपाची असते. जमिनीतील झाडांची मुळे जमिनीच्या मातीतून पाण्याबरोबर इतर द्रव्ये शोषून घेतात. त्यातून झाड जोमाने वाढत असते. फांदीचे पानाचे, फुलाचे, फळाचे पोषण होते. त्यातून सौंदर्य वाढते. त्याचप्रमाणे साहित्यकृतीचे ही घडत असते. साहित्यकृतीतील संवेदना, भावना, विचार, शब्द, अर्थ, प्रतिमा आणि प्रतिके या सर्व घटकांचा वाचकाच्या मनावर एकत्रित परिणाम होतो. कोणतीही कलाकृती काहीना काही संदेश देत असते. कारण सूचकता हेच साहित्याचे खरे प्रयोजन आहे. साहित्यकृतीचे साहित्यमूल्य वाढविण्यासाठी सूचकता फार उपयुक्त ठरते. ज्यांच्या प्रत्येक कवितेत सूचकता या साहित्यमूल्याचा जाणीवपूर्वक विचार केलेला दिसतो. असे कवी म्हणजे नाशिकचे संजय चौधरी होय. आज ‘कवि आणि कविता’ या सदरात आपण त्यांच्या कवितांचा आस्वाद घेणार आहोत.
कवी संजय चौधरी यांनी १९८४ मध्ये विद्युत अभियांत्रिकीमधील पदविका प्राप्त केली. नाशिक येथील एका नामांकित कंपनीमध्ये प्रॉडक्शन इंजिनीयर म्हणून १५ वर्ष नोकरी केली. याचकाळात त्यांच्या कवितेने नावलौकिक मिळविला.कवितेच्या क्षेत्रात त्यांना कवी म्हणून त्यांच्या कवितेने त्यांना नाव मिळवून दिलं. नाशिक येथील एच.पी.टी महाविद्यालयातून १९९१ साली त्यांनी मराठी विषयात एम.ए पदवी विशेष प्राविण्यासह प्राप्त केली. पाठोपाठ २००० साली सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. याकालावधीत त्यांनी विविध वक्तृत्व आणि विशेषत: काव्यस्पर्धेत त्यांच्या कवितांनी अनेक पारितोषिके मिळविली. याच दरम्यान कंपनीने कामगार आणि अधिकारी वर्गाची कपात केली. त्याचा फटका बसून त्यांना नोकरी गमवावी लागली. कवी संजय चौधरी यांनी त्याचवर्षी जळगावच्या एस.एन.डी.टी महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून सेवेला सुरवात केली. आयुष्याला वेगळी दिशा मिळाली.परंतु तो आंनद ज्यास्त काळ टिकला नाही. दोन वर्षात ही नोकरी सोडावी लागली. या जीवन संघर्षात ते कधीच नाऊमेद झाले नाही. शिक्षकी पेशाने त्यांचा स्वत:वरचा विश्वास अधिक दृढ आणि सकारात्मक बनविला होता. त्यानंतर त्यांनी सलग तीन वर्षे आय.एस.ओ. ९००१ – २००० मानांकनासंदर्भात एका संस्थेत प्रशिक्षक म्हणून काम केले. या काळात स्वत:तला शिक्षक आता अधिक परिपक्व बनला गेला. त्यांनतर सातारा येथील धन्वंतरी डिस्ट्रीब्यूटर्स प्रा.लि.मध्ये कामाला सुरवात केली. चांगलं वक्तृत्व व कामात जीव ओतण्याची वृत्ती या बळावर कंपनीच्या उत्पादन विक्रीत उल्लेखनीय वाढ करीत आज बारा वर्षाच्या सेवेत सुपर एक्झिक्युटिव्ह पदावर विराजमान झालेत. आपल्या वक्तृत्व शैलीच्या बळावर त्यांनी कंपनीच्या डायमंड श्रेणीत प्रवेश मिळविला. ही त्यांच्या कामाची पावती आहे. ही त्यांच्यासाठी आणि कंपनीसाठी सर्वात गौरवाची गोष्ट आहे. या कालावधीत त्यांनी महाराष्ट्र पायाखाली घातला. माणसं जोडली. महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या अधिकारी,पदाधिकारी वर्गास प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. याच काळात त्यांची कविता अधिक फुलली… बहरली. महाराष्ट्रभर मैत्रीचं जाळं विणलेला कवी म्हणून साहित्यक्षेत्रातील सारेच त्यांना ओळखतात. सन २००५ साली जानेवारीत महिन्यात ‘माझे इवलं हस्ताक्षर’ नावाचा पहिला काव्यसंग्रह तर २०१८ साली ‘कविताच… माझी कबर‘ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. ‘माझे इवलं हस्ताक्षर’ या काव्यसंग्रहाची एका महिन्यात पहिली आवृत्ती संपली गेली. ‘या काव्यसंग्रहाची फेब्रुवारी महिन्यात दुसरी आवृत्ती प्रकाशनाला काढावी लागली. ‘कविताच… माझी कबर’ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.त्याचीही पहिली आवृत्ती पुढच्या तीनचार महिन्यात संपली. प्रकाशनाला ऑक्टोबर २०१८ मध्ये दुसरी आवृत्ती काढावी लागली.असे यश संजय चौधरी सारख्या कवीच्या आणि कवितेच्या वाट्याला यावे,हीच तर त्यांच्या कवितेची खासियत आहे. ही बाब मराठी पुस्तकांच्या आणि तेही कवितेच्या संदर्भात यापूर्वी कधीही आणि कोठेही कुणाच्याच बाबतीत घडली नसावी. त्यांच्या ‘माझे इवलं हस्ताक्षर’ काव्यसंग्रहाने त्यांना राज्यभरातून अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळवून दिले. त्यात नाशिकच्या मुक्त विद्यापीठाचा विशाखा काव्यपुरस्कार, औदुंबर, जि.सांगली येथील कवी सुधांशू काव्यपुरस्कार, अहमदनगरचा कवयित्री संजीवनी खोजे काव्यपुरस्कार, बुलढाणा येथील महाराष्ट्र अनुवाद परिषदेचा तुका म्हणे पुरस्कार, पुणे येथील यशवंतराव चव्हाण काव्यपुरस्कार, डोंबिवलीचा सुजाता पाब्रेकर काव्यपुरस्कार, मुंबईचा आशीर्वाद पुरस्कार, अकोला येथील अंकुर साहित्य मंडळाचा अंकुर साहित्य पुरस्कार, नाशिकच्या होली क्रॉस चर्चचा कविवर्य ना.वा.टिळक काव्यपुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. त्यानंतर सन मे २०१८ साली ‘कविताच… माझी कबर‘ हा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित झाला.त्याचीही पहिली आवृत्ती पुढच्या तीनचार महिन्यात संपली. प्रकाशनाला ऑक्टोबर २०१८ मध्ये दुसरी आवृत्ती काढावी लागली. या काव्यसंग्रहाला इंदौर( मध्यप्रदेश)चा वसंत राशीनकर अखिल भारतीय सन्मान, बडोदा (गुजरात )येथील मराठी वाङ्मय परिषदेचा अभिकूची वाङ्मय पुरस्कार, राजगुरूनगर, पुणे येथील पद्मश्री नामदेव ढसाळ काव्यप्रतिभा पुरस्कार, कोल्हापूरच्या नरेंद्र विद्यापीठाचा डॉ.न.ना.देशपांडे उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार,कोल्हापूर जिल्ह्यातील रेंदाळ,(हातकणंगले) येथील रेंदाळकर वाचनालयाचा कविवर्य रेंदाळकर काव्यपुरस्कार, उस्मानाबादच्या संत मुक्ताई मंदिर ट्रस्टचा श्रीसंत मुक्ताई राज्यस्तरीय काव्य पुरस्कार, गुहागर, रत्नागिरीचा . पसायदान प्रतिष्ठान पुरस्कार, भोसरी, पुणे येथील म.सा.परिषदेचा गदिमा पुरस्कार, पलस, सांगलीचा ज्ञानेश्वर कोळी काव्य पुरस्कार, जळगाव येथील स्व. दलीचंद बस्तीमल सांखला यांचे स्मरणार्थ सूर्योदय काव्यपुरस्कार, मुंबईचा दत्तात्रय कृष्ण सांडू काव्यपुरस्कार, गारगोटी, कोल्हापूरच्या अक्षर सागर साहित्य मंचचा काव्यपुरस्कार, कडा, जि.बीड येथील साहित्य ज्योती काव्यपुरस्कार, अमरावती येथील सुदाम सावरकर साहित्य पुरस्कार समितीचा स्व. गुलाबसिंग सोळकी काव्यपुरस्कार, मिरज, जि.सांगलीचा चैतन्य शब्दांगण साहित्य पुरस्कार, , रांझणीचा नवरत्न साहित्य पुरस्कार,सिन्नर येथील महाराष्ट्र साहित्य परिषदेचा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार, सोलापूरचा कवि रा.ना.पवार पुरस्कार,चंद्रपूर येथील सूर्या शिक्षण संस्थेचा शिवाजीराव चाळक काव्य पुरस्कार, पिंपरी चिंचवड, पुणे येथील महाराष्ट्र राज्य शासनाशी संलग्न असलेल्या जीवन गौरव मासिकाच्या वतीने दिला जाणारा शब्दपन जीवन गौरव काव्यमंच पुरस्कार, नाशिकचा प्रा.सुरेश मेणे साहित्य पुरस्कार, नाशिकचा प्राचार्य वसंतराव कर्डिले पुरस्कार, मूर्तिजापूरचा सृजन प्रतिभा काव्यपुरस्कार, नाशिकचा स्व. स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार, मंगळवेढा, सोलापूरच्या शब्दकळा साहित्य संघाचा उत्कृष्ट राज्यस्तरीय काव्यपुरस्कारांसह अनेक राज्यपुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. तसेच दिल्लीच्या विजया बुक्सने प्रकाशित केलेल्या प्रकाश भातंब्रेकर यांनी अनुवादित व संपादित केलेल्या ‘मराठी कविता का समकाल’ या हिंदी काव्यसंग्रहात कविताचा समावेश. इंदौर, मध्यप्रदेश येथिल चैतन्य प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या व श्याम खरे यांनी संपादित केलेल्या ‘महक मराठी हाईक की’ या हिंदी हायकू संग्रहात हायकू समाविष्ट करण्यात आल्या आहेत. औरंगाबादच्या स्वरूप प्रकाशनाने व प्रकाश देशपांडे केजकर यांनी लिहिलेल्या ‘समकालीन मराठी कविता: एक निरीक्षण,’ या समीक्षा ग्रंथात ‘माझे इवले हस्ताक्षर’, या कवितासंग्रहाचा समावेश झालेला आहे. पुणे येथील सुविद्या प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ‘१९९० नंतरची मराठी थीम कविता’ या पुस्तकात आईच्या अकरा कवितांचा समावेश झालेला आहे. डॉ. बाळासाहेब लबडे यांनी संपादित केलेल्या ‘समीक्षा–डॉ. नागनाथ कोत्तापल्ले’ या समीक्षा ग्रंथात त्यांच्या कवितांचा परामर्श घेतला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी संपादित केलेल्या १९९८ च्या ‘मधमाशी’ दिवाळी अंकाला अलिबाग, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा, बार्शी, जि.सोलापूरच्या स्व.सीताबाई सोमाणी प्रतिष्ठानचा आणि ठाणे येथील तन्वी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कवी संजय चौधरी यांची कविता त्यांच्या सारखी साधी, सोपी आणि सरळ असली तरी ती आशयाचं मोठं अवकाश व्यापणारी आहे. त्यांची बहुतांश कविता स्वत:शी संवाद करणारी आहे. मानवी मनाच्या विविधांगाना स्पर्श करणारी आहे. मानवी मनातली स्पंदनं टिपणारी आहे. ती आतल्या क्रोधाला,रागाला वाट मोकळी करून देतांना दिसते. त्यांना पडलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे त्यांची कविता देताना दिसते. त्यांच्या कवितेत मनातला सारा कोलाहल शब्दबध्द होताना दिसतो. जन्म आणि मृत्यू या दोघामधील अंतरावर भाष्य करताना त्यांची कविता दिसते. त्यांच्या कवितेत मनातली तडफड आहे.तगमग आहे.त्याचं निर्व्याज मनातलं स्वगत आहे. जीवनावरचं वास्तव भाष्य आहे. मानवी मनातली निर्मळ स्पंदनं आहे. त्यांच्या कवितेला चिमण्या बाळाच्या ओठांवरच्या दुधाचा वास आहे. बुध्दाच्या सत्याच्या आणि शांतीच्या मार्गाचा ध्यास आहे. त्यांच्या कवितेत माऊलीच्या कुशीची ऊब आहे. ईश्वराची व्याकुळ प्रार्थना आहे, वेदनेची आर्तता आहे. अंत:करणातला सच्चा स्वर आहे. स्पष्टोक्तीचा चमकणारा जर आहे. त्यांची कविता स्वप्नरंजनात रमत नाही. विषयांच्या अनवट वाटा धुंडळताना दमत नाही.चौधरी यांची कविता दवासारखी नितळ आणि पाण्यासारखी प्रवाही आहे. त्यांच्या कवितेला स्वत:ची एक लय आहे. त्यांची कविता भूत, भविष्य आणि वर्तमानाचा चेहरा घेऊन येते. जीवनातले अनेक स्थित्यंतरे नोंदवून जाते. कवीमनाची घुसमट मांडून जाते. ग्रामीण आणि नगर संस्कृतीच्या मध्यावर त्यांच्या कवितेचं भरण पोषण झाल्याने ती दोहोंना कुशीत घेते. या दोन्ही संस्कृतीतील मानवी समूहाच्या गतीचित्राने त्यांच्या संवेदनशील मनाची जडणघडण झाल्याने त्यांच्या जाणीवेचं आवकाश ती व्यापतांना दिसते.तिच्यात बालकाची निर्व्याज निरागसता जागोजागी डोकावत राहते. ती वाचकाच्या मनात झरा होऊन झुळझुळत राहते. पाण्यासारखे अर्थाचे भावतरंग मनावर उमटवत राहते. तसेच सृजनशील विचारांची सुंदर रांगोळी चित्रांकित करीत राहते. त्याचबरोबर जीवनातील विविध घटीतांचा अन्वयार्थ लावण्याचा ती प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसते. त्यांची कविता चारचौघींसारखी वाचकांशी गप्पा करीत राहते. हितगुज करीत राहते. अशा गप्पांच्या ओघात कवितेवर भाष्य करतांना ती मागेपुढे पाहत नाही. हे सांगताना कवी संजय चौधरी कवी आणि कवितेची भूमिका स्पष्ट करतांना लिहितात-
दगड झालेल्या माणसांच्या अश्रूंना
वितळवलं पाहिजे कवितेनं
उकिरड्यावर फेकून दिलेली मूल्ये
घासून पुसून पुन्हा मांडली पाहिजेत
माणसाच्या काळजाच्या दिवाणखान्यात.
कवितेनं जरा व्यासपीठावरून खाली उतरावं
घामाच्या धारांनी सजवावं कवितेनं स्वतःला.
कवितेनं आजारी माणसासारखं
नुसतंच कागदावर झोपून राहू नये
उठून जरा शुश्रुषा करावी
मोडलेली हाडं पुन्हा जुळवून द्यावी कवितेनं.
खरं म्हणजे कवितेनं केलं पाहिजे माणसांचे
पुन्हा एकदा माणसात रुपांतर
कवीनं अडकू नये पुरस्कारात
होऊ नये अर्ध्या हळकुंडात पिवळं
कवीच्या कवितेची चिंधी
फडफडत राहिली पाहिजे झेन्ड्यासारखी
कवितेनं आई व्हावं अवघ्या विश्वाची.
कविता लेखनामागे कवीची भूमिका असावी. नव्हे तर भूमिका घेऊनच कवीने कविता लिहिली पाहिजे. याबाबत कवी संजय चौधरी आग्रही आहेत. आपल्याच वर्तमानाचा विचार करणारे, कधीच कवी होत नसतात. खरे तर कवितेने पाण्यासारखी तहानलेल्याची तहान भागवली पाहिजे. अन्नपानी होऊन भूकेल्यांची भूक भागविली पाहिजे. इतका उदात्त आणि व्यापक हेतू कविता लेखनामागे कवीचा असावा. कवीने व्यासपिठावर न मिरवता श्रमिकांच्या जीवनाची अनुभूती घ्यावी. घामाची किंमत समजून घावी. पुरस्कारांच्या अर्ध्या हळकुंडात कवीने पिवळे होण्याची अभिलाषा धरता कामा नये. अशा परखड आणि स्पष्ट शब्दात त्यांची कविता कवींची कानउघडणी करायला मागेपुढे पाहत नाही. कवीने काय लिहावं ? कसं लिहावं ? याचा ध्यास सतत मनात असल्याने ते स्वत:बद्दल तटस्थपणे लिहितात-
संजय चौधरी भेटतो मला अधून मधून
हरवलेल्या गल्ल्यांमधून भटकताना
पत्ता हरवलेल्या लहान मुलासारखा
मी त्याला म्हटलं,
अरे ! लिहिशील का एखादी वेलांटी गालिबसारखी
जमेल का एखादा उकार रिल्केसारखा
एखादी अर्धी ओळ तुकोबासारखी
कबीर, मीरा झिरपतील का थेंबभर
… तुझ्या ‘इवल्या हस्ताक्षरा‘तून
की, नुसता दळत बसशील तेच ते दळण
वर्षानुवर्ष …. आऊटडेटेड जात्यावर?
कोणत्याही कवीने आपल्या लेखनामागची भूमिका पहिल्यांदा नक्की केली पाहिजे. गालिब, रिक्ले,तुकोबा ,कबीर,मीरा यांच्या सारख्या अनेकांनी स्वत:ला एका विचारधारेशी जोडून घेऊन आयुष्यभर कविता लिहिली. बांधिलकी जपली. प्रत्येक कवीने आपल्या भूमिकेशी प्रांजल राहून लेखन केले पाहिजे. हे स्वत:च स्वत:ला सांगणे जड जाणारे असते. परंतू त्यांची कविता दस्तूरखुद्द कवी संजय चौधरी यांचे कान टोचता ना दिसते. इतकं तटस्थपणे दूर राहून स्वत:च स्वत:ला सूचित करण्याचे काम त्यांची कविता करतांना दिसते. जगण्याच्या लढाईत संघर्ष करताना पाखरांप्रमाने माणसं थव्याथव्याने शहरांकडे वळत आहे. अशी माणसं गुलाम बनवून आयुष्यभर नागवली जातात. अशांना संदेश आणि सल्ला देतांना ते लिहितात-
नंग्यांच्या दुनियेत कपडे घालून आलास
तेव्हाच मी ओळखलं … तुझं काय बी खरं नाय
काळाचा महिमा ओळख…दादाला सलाम कर
खिशात रामपुरी बाळग नायतर डायरेक्ट घोडा
सोबत असू दे सायनाईडची पुडी
हजामत करणारा पण इथे तुला चंदन लावेल
ठेवला जाईल वस्तरा तुझ्या मानेवर
नखरेल एखादी हसून घालेल खिशात हात
घेईल थेट तुझ्या गिअरचा ताबा.
गंजत बसू नकोस .. तुझी ‘ष्टोरी‘ उगाळू नकोस
रंग बदल, नाहीतर दुनिया बदल
चल … सटक इथून … लटक लोकलला
नाहीतर आयुष्यभर सडत पडशील
… प्लॅटफॉर्मवरच
खेड्यापाड्यातून पोटासाठी माणसांचे लोंढे शहरांकडे जात आहे. शहरं भुकेलेल्याला भाकर देत असली तरी त्यांच्या अडाणी आणि अज्ञानाचा फायदा उठवायला मागेपुढे पाहत नाही.त्यातून गुलामी वाट्याला आल्याशिवाय राहत नाही. जसा देश तसा वेश या न्यायाने वागता आलं पाहिजे. समोरचं जग आणि माणसं ओळखता आली पाहिजे. जीवन जगण्याचं हे शाहाणपण सामान्यातल्या सामान्य माणसाला आलं पाहिजे. शहरी जीवनाची बाराखडी आवगत करता आली पाहिजे. नव्हे ती आवगत केलीच पाहिजे. असा घरचा सल्ला त्यांची कविता देतांना दिसते. जगण्याच्या जीवन संघर्षात अनेक माणसं हतबल होतात. नाऊमेद होतात. अशी माणसं पळून जातात. स्वत:चा चेहरा लपवतात. ओळखींच्या माणसांपासून दूर जातात. अशा माणसांच्या मानसिकतेवर बोट ठेवतांना कवी संजय चौधरी लिहितात-
इथे कुठे चेहरा बदलून मिळेल का?
याची चौकशी करत होता तो
असं सांगताहेत त्याला पाहिलेले लोक
खरं तर त्याला वाटतेय भीती
त्याच्याच माणसांची
दचकून उठतो तो भर झोपेतही
होतो तितर बितर
ओळखणारे कुणी भेटेल या कल्पनेने
त्याला शोधून काढले जाईल की काय
या संभाव्य भीतीने
बदलत राहतो तो शहरामागून शहर.
आज माणूस ओळखीच्या माणसांच्या जाचाने पिचत चालला आहे. आजच्या वर्तमानात माणसं आपल्या माणसांपासून चेहरे लपवतात. अनोळखी माणासांच्या गर्दीत मिसळून जातो. हे वास्तवसत्य त्यांची कविता मांडते. त्याचबरोबर माणसातल्या माणुसकीला अधोरेखित करून जाते. माणसांची माणसांना भीती का वाटावी. माणसांच्या भावना व्यवहारीपणाने बधीर करून टाकल्या आहेत. माणूस आज स्वत:चीच ओळख विसरायला तयार झाला आहे. स्वत:पासून दूरावयाला तयार झाला आहे. माणूस कोरडा झाल्याची खंत त्यांची कविता करतांना दिसते. ईश्वरवादावर कवी संजय चौधरी फार समर्पक शब्दात भाष्य करतात-
सोमवारी मंदिरात जातो
शुक्रवारी मशिदीत नमाज पढतो
रविवारी चर्चमध्ये कन्फेशन करतो
गुरुद्वारात ग्रंथसाहिब समोर नतमस्तक होतो
इवलासा भिक्खू होऊन
बुद्धासोबत ध्यानाच्या महासागरात मी मला सोडून देतो
दगडाला देव मानतो आणि देवाला दगड
सर्व धर्मानी माणूस मध्यवर्ती कल्पून नीतीनियम त्यावर लादले आहे. धर्म कोणताही असू त्याचा अनुयायी माणूस आहे. माणूस नसेल तर धर्माला काहीच अर्थ राहत नाही. म्हणजे धर्म हे कपड्यांसारखे बाह्य प्रावरणे आहेत. त्यांचे रंग वेगळे असले तरी आतला माणूस मात्र सारखा असल्याची, एक असल्याची जाणीव त्यांची कविता वाचकांना करून देते. त्याचबरोबर देव आणि दगड यातील भेद आणि साम्य यावर स्पष्ट भाष्य करतांना दगडाला देव आणि देवाला दगड मानले तर कोणताच फरक पडत नसल्याचे सांगून धर्मांधांच्या डोळ्यात अंजन घालताना दिसते. दगडात देव पाहणारा माणूस मात्र जिवंत माणसाला भेटायचे टाळतो हे सांगताना कवी संजय चौधरी लिहितात –
माणूस मरण पावला की,
भेटीला जातात लोक तसा रिवाजच आहे
जिवंत माणसांना भेटायला जाण्याची पद्धत
होत चाललीय कालबाह्य …. दिवसेंदिवस
तंत्रज्ञानाच्या युगात माणसं यंत्रवत बनत चालली आहे. जिवंतपणी माणसांना भेटायचे सोडून तो मेल्यावर भेटायला जाण्याची जणू रीत बनली. खरे म्हणजे त्या भेटीत विचारांची,संस्कारांची देवाणघेवाण होते. एकमेकांचा सहवास सर्वांना सुखावून जातो. त्यातून धीर मिळतो. मानसिक आधार मिळतो. हे सर्व कालबाह्य झाल्याची खंत त्यांची कविता मांडतांना दिसते. आज माणूस हा दैववादी बनतो आहे. आपल्या सर्जनशील हातांवर, आपल्या कष्टावर त्यांचा विश्वास राहीला नाही. हे सांगतांना चौधरी लिहितात-
हे दिवे जळतात कशासाठी ? ही फुलं गळतात कशासाठी ?
घडत तर काहीच नाही ,मग ही पानं सळसळतात कशासाठी ?
मागत राहता खुळ्यासारखा मागितलं ते कधी मिळतं का?
थोट्या हातांनी थोपवू पाहतो जे अटळ ते कधी टळतं का?
मग हे खुळे हात पुन्हा पुन्हा इथे तिथे जुळतात कशासाठी?
माणसाने स्वत:च्या हातावर विश्वास ठेवावा.कर्मावर विश्वास ठेवणारा माणूस आयुष्यात काहीतरी करू शकतो. त्याच्या भोवतालचे निसर्गचक्र त्याला सदोदित सांगत राहते. शिकवत राहते. तरी तो बोध घेत नाही. आपण कुठेही गेलो तरी दोन श्वासामधलं आणि पायातलं अंतर बदलत नाही. कष्टाऐवजी आपण दैवावर ज्यास्त विसंबून का राहतो ? आपण हात का जोडतो ? आणि कशासाठी जोडतो ? असे अनेक प्रश्न त्यांची कविता उधृत करते. आज मुली आणि स्त्रिया अन्याय आणि अत्याचाराच्या बळी ठरत आहे. त्यावर अतिशय परखड शब्दात भाष्य करतांना चौधरी लिहितात-
मला जर झाली मुलगी
तर मी तिचं नांव सीता ठेवणार नाही
समजा ठेवलेच… तर तिचं लग्न रामाशी लावणार नाही.
गर्भारपणी बायकोला
जंगलात सोडणाऱ्या पुरुषाला
दुसऱ्यांदा (!) कोण आपली मुलगी देईल?
त्याच्या काळी तरी
गावात असेल एखादाच धोबी
जिभेला हाड नसलेला
इथे तर गल्ली–गल्लीत, चौका–चौकात
धोबीच धोबी जीभ परजून… वाट पाहणारे.
रामराज्याचा ध्यास करणा-या,रामाच्या चरित्र आणि चारीत्र्याचा गौरव करणा-याना त्यांची कविता प्रश्न विचारून अनुत्तरीत करते. रामाच्या देवत्वाआड लपलेल्या माणसाच्या मतलबीपणाचा चेहरा जगासमोर मांडते. भावना आणि व्यवहार याचा पाढा वाचते. आजच्या सामाजिक वास्तवाचे भीषण सत्य त्यांची कविता चारचौघात मांडतांना दिसते.
आजचे सामाजिक वास्तवावर बोट ठेवतांना कवी संजय चौधरी लिहितात-
गंगेवर एक म्हातारी आंघोळ करीत होती.
अंगातून रक्त निघेपर्यंत
दगडानं अंगावरची कातडी घाशीत होती.
तिला म्हणालो,
‘बये! ही कोणत्या उभ्या जन्माची आंघोळ?
की, केला होतास गंगेला असा नवस?’
ती म्हणाली, ‘राजा! ही आंघोळही नाही अन् नवसही.
फक्त आयुष्यभर या कातडीला चिकटलेल्या
लोकांच्या नजरा धुतेय.‘
त्यांची ही कविता समाजमनाच्या हीन मानसिकतेचे एक उदाहरण समोर ठेवते. स्त्रीमध्ये ममत्व,देवत्व पाहणारी आपली संस्कृती आज कुठे आहे ? असा खोचक सावाल त्यांची कविता करतांना दिसते. किंवा सामाजिक आणि धार्मिक मानसिकता किती वेगाने बदलते आहे. हे सांगताना ते लिहितात-
पाऊस एकदा
हिंदू–मुसलमानांच्या दंगलीत सापडला.
हिंदूंनी मुसलमान समजून झोडपला.
मुसलमानांनी हिंदू समजून झोडपला.
पण पाऊस नसतो कधीही हिंदू वा मुसलमान.
मात्र पावसाच्या प्रत्येक थेंबात असते मंदिर… मशीद… चर्च…
निर्गुण निराकाराचा अंश–अंश.
मी पावसाला
एका कोपऱ्यात व्याकुळ होऊन रडताना पाहिला.
माणसाचा धर्म स्वत:पासून सुरु होतो.कपडे घालावे तसा तो जन्मल्याबरोबर बापाचा/आईचा धर्म परिधान करतो. जन्मापूर्वी त्याला जात,धर्म चिकटलेले नसतात. धर्म ही एक मानसिकता आहे. आम्ही मात्र धर्माचा विपर्यास करतो. धर्माचा संदर्भ आम्ही निसर्गदत्त पंचमहाभूतांपर्यंत घेवून जाण्यास मागेपुढे पाहत नाही. खरे म्हणजे पावसाच्या प्रत्येक थेंबात मंदिर,मज्जीद,गुरुद्वार आणि चर्चमधलं पावित्र्य असल्याचे त्यांची कविता अधोरेखित करते. आयुष्यातल्या घाव, आघातांचे महत्व अधोरेखित करताना ते लिहितात-
पहिला घाव बसला तेव्हा गांगरलो–बावरलो
दुसऱ्या दुखऱ्या घावानंतर थोडासा सावरलो
नंतर मात्र घावांमागून घाव बसत गेले
आयुष्यावर घावांचेच गाव वसत गेले.
घावांशी हसलो–बोललो
घावांसोबत चार पावले चाललो
घाव जुने होत गेले – मी नवा होत गेलो.
घावांच्या प्रकाशात आजवर
जिणे जगत आलो आहे
इथवर आता या वळणावर
मी नव्या घावांची वाट पहातो आहे.
जीवनात घाव आणि आघात परीक्षा पाहण्यासाठी येत नसून आपल्या कार्यक्षमतेचा अंदाज बघायला येतात. आपल्या क्षमतांची चाचपणी करण्यासाठी येतात. आयुष्यातल्या या प्रसंगातून आपण कोणता सकारात्मक विचार घेतो. याला महत्व आहे. प्रत्येक प्रसंग काहीतरी आपल्या पदरात टाकून जातो. जीवनातले घाव हे नेहमी जीवन जगायला वाव अथवा जागा करून देतात. याची जाणीव त्यांची कविता प्रकर्षाने देवून जाते. सुख आणि दु:खावर भाष्य करतांना कवी संजय चौधरीन मार्मिक शब्दात मांडतात-
सुखानं असं उतू जाऊ नकोस… थोडं थांब.
असतं आसपास… अगदी हाकेच्या अंतरावर
..दुःख नसतं लांब.
दुःख येतं मारतं कडकडून मिठी
बरगड्या तुटल्याचा आवाज होईपर्यंत.
नांव, पत्ता, शहर काहीही बदललंस, ..
दुःखाला रक्ताचा वास येतो.
तरी तुला शोधत येईल.
आणि लक्षात ठेव प्रत्येकवेळी दुःखानं
बदललेला असतो त्याचा चेहरा.
सुख आणि दु:खं हे नेहमी सोबत असतात. त्यांचा वावर सर्वत्र असतो. ते नेहमी एकापाठोपाठ येतात. परंतु प्रत्येकवेळी त्यांनी त्यांचा चेहरा बदालेला असतो. आपण आपले नाव, पत्ता बदलला तरी ते नाव,गाव विचारीत आपल्या पर्यंत पोहोचतात. कारण दु:खाला रक्ताचा वास लवकर येतो. म्हणून दु:खं पाठ सोडीत नाही. आजच्या कवींच्या लेखनाचा समाचार घेतांना संजय चौधरी परखड शब्दात लिहितात-
उफाळत नाही त्याच्या आतला समुद्र
पिळवटत नाहीत आतडी,
कवी गुरगुरत नाही व्यवस्थेवर
इतका झालाय पाळीव.
कवीच्या लेखणीवर कुणी पहारा बसवलाय?
की, त्याची लेखणीच झालीय बाजारबसवी?
कवी नखं काढलेला…दात पाडलेला…
कवी बंद… पुरस्काराच्या पेटाऱ्यात.
कवीला इतके हार घातलेत की,
जगण्याच्या दुर्गधीला पारखा झालाय कवी
मान–सन्मानांच्या ओझ्यानं वाकलाय कवी
कुणाच्या अदृश्य पायांशी झुकलाय कवी.
हादरवून सोडेल अन् उलथवून टाकेल
असा शब्द हरवून बसलाय कवी.
लोकशाही शासनप्रणालीत विचार स्वातंत्र्याला अधिक महत्व आहे. कविता हा विचार स्वातंत्र्याचाच एक भाग आहे. सामाजिक दायित्व म्हणून कवीची समाजाप्रती सामाजिक बांधिलकी असते. वेळप्रसंगी व्यवस्थेच्या चुकीच्या
धोरणांच्या विरोधात कवीने कवितेचे हत्यार उपसले पाहिजे. जगात जिथे जिथे क्रांती झाली तिथे तिथे अग्रभागी कवी होते. त्यांची कविता होती. कवितेत समाज जागा करण्याचे मोठे सामर्थ्य असते. परंतु आज मराठी साहित्यातील कवी कुणाच्याना कुणाच्या दावणीला बांधले गेल्याची खंत त्यांची कविता करतांना दिंसते. कवी पुरस्काराच्या मागे लागल्याने व्यवस्थेला सुरुंग लावेल असा सामर्थ्यवान शब्द कवी हरवून बसल्याची खंत त्यांची कविता करतांना दिसते. आपल्या कर्तव्याशी माझी कविता नेहमी प्रामाणिक राहील. ती तिची भूमिका कधी सोडणार नाही. हे सांगताना कवी संजय चौधरी लिहितात-
मला ठाऊक आहे
लेखणीत सामावू शकतं अवघं जग,
तिन्ही काळ, दाही दिशा
हवा, पाणी, वाऱ्यासह सारा अवकाश.
आईच्या दुधातून
माझ्या ओठांत उतरलेल्या भाषेत
मांडीन मी अवघी कासावीशी.
माझ्या वाट्याला आलेल्या
काळाच्या तुकड्यावर मी कोरीन
माझं इवलं हस्ताक्षर.
मी माझ्या कवितेतून पालवीपासून… पाचोळ्यापर्यंत, कळीपासून ते थेट निर्माल्यापर्यंत लिहिण्याची भाषा करतो. निर्जीव आणि सजीव दोहोंना जोडणाऱ्या मातीच्या कणाकणावर लिहिण्यासाठी सदैव सिद्ध असल्याचे अभिवचन कवी आपल्या कवितेतून देतो आहे. इथल्या माणसांच्या जगण्याचा सारा कोलाहाल कवितेतून मांडण्याची तयारी त्यांची कविताही कवीप्रमाणे दर्शवताना दिसते. अलीकडे रस्त्यांना नावे दिली जातात. परंतु स्मशानाच्या रस्त्यांना नाव नसल्याची खंत व्यक्त करतांना कवी संजय चौधरी लिहितात-
माझे नाव उद्या कधीतरी
एखाद्या रस्त्याला द्यायचं झालंच तर …
स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याला द्या
माझे सगळे जिवलग याच रस्त्याने गेलेले
माझ्यानंतर येणारे ही येतील याच रस्त्यावरून शेवटचे
दुसरा रस्ता आहे कुठे .. ?
संजय चौधरी या रस्त्याने शेवटचंच गेला
अशी पाटी लावा हवी तर–
समाजाच्या मानसिकतेच्या विसंगतीवर मार्मिकपणे टीका टिपणी करतांना स्मशानाच्या रस्त्याला कवीचे नाव देण्याची इच्छा त्यांची कविता उपहासाने करते. त्याचबरोबर माणसांच्या पावलांचे भूतलावरील अखेरचे नाते इथेच तुटते. श्वासांचे बोट हातून निसटून जाते. आयुष्याचा हाच खऱ्या अर्थाने शेवटचा बिनपावलांचा इतरांच्या खांद्यावरचा प्रवास हाच आयुष्याचा डेड एंड आहे.हे निसर्ग आणि वैश्विकसत्य त्यांची कविता सांगून जाते.
थोड्यात कवी संजय चौधरी यांच्या कवितेला चांगले सामाजिक भान आहे. आपापल्यापरीने सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांची कविता प्रामाणिक प्रयत्न करतांना दिसते. त्यांच्या कवितेत त्यांच्या स्वत:च्या जाणिवेचे स्वतंत्र प्रतिमा विश्व आहे. या सा-या प्रतिमा त्यांच्या जगण्यातल्या आणि अनुभवातल्या आहे. त्यामुळे त्यांच्या चिंतनाला वेगळी झळाळी येते. कविता वाचकाच्या मनात आरपार उरत जाते. काळजात घर करते. चौधरी यांची कविता मानवी मनाच्या विविध प्रवृत्तीचे दर्शन घडविताना दिसते. त्याचप्रमाणे मानवी प्रवृत्तीचे विश्लेषण करतांना दिसते. मानवी मनाच्या वृत्ती,प्रवृत्तीचे, सहसंबंधांचे,नीतीमूल्यांचे,जुन्या नव्या संस्कारांचे दर्शन त्यांची कविता प्रभावीपणे घडविताना दिसते. कवी संजय चौधरी यांची कविता काहीशी आत्मसंवादी असली तरी ती वास्तवाला भिडतांना दिसते. समाजातील अनिष्टतेवर ती हल्लाही करतांना दिसते.त्यांच्या कवितेत गेयतेपेक्षा सहजता आहे. लालित्य आहे. त्यांची कविता समाजातील स्थितीगतीवर भाष्य करते. ती काहीशी कालप्रवाही आहे. ती जशी मानवी मनोवृत्तीवर भाष्य करते. तशीच ती साहित्यिकांच्या मनोव्यापाराचा खरपूस समाचार घेतांना दिसते. त्यांच्या दांभिकतेवर कडाडून हल्लाबोल करते. कलावंत म्हणून सामाजिक दायित्वाची जाणीव करून देते. ती जशी कलावंताला विस्तवाशी मैत्री करायला सांगते, तसेच तहानेचं कुळ असल्याचे जाणीवपूर्वक आठवण करून देताना दिसते. चौधरी यांची कविता पायात पाय मिसळून नाचायला जशी शिकविते. तशीच हातात हात घेऊन माणसात मिसळायलाही शिकविते. अनेकांना पडणा-या प्रश्नांचे उत्तर व्हायला सुचीत करते. वयात येणा-या, वयात आलेल्या मुलींचे निरामय भावविश्व व्यक्त करते. त्या दोलायमान मनाच्या वयाची स्पंदनं अलवार टिपताना दिसते. तसेच वयातून गेलेल्या माणसांचे कान टोचतानाही दिसते. त्यांची कविता स्त्रीमनाच्या भाव विश्वातले अभिसरण टिपताना दिसते, तसेच प्राणिमात्रांच्या भवाविश्वात रममाण होतांना दिसते. त्यांच्या आईच्या आणि आई गेल्यानंतरच्या कवितांमधील भाव व्याकुळता, निरागसता,निर्मळता आणि प्रांजळता वाचक रसिकाच्या मनावर दीर्घकाळ झाकोळून राहते. मला वाटतं हे चांगल्या कवितेचं लक्षण आहे. अशीच सजग मनाने त्यांच्या कवितेची वाटचाल अधिकधिक सुदृढ होवो. त्यांच्या कवितेला उच्चकोटीची प्रगल्भता येवो. अशी अपेक्षा करतो. त्यांच्या कवितेच्या पुढील वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा देऊन थांबतो..