नाशिक – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ योजनेला सुरुवात झाली आहे. नाशिक महानगरपालिकेतर्फे यासाठी प्रभावी पथके तयार करण्यात आली आहेत. विभागनिहाय कर्मचारी कार्यरत झाले आहेत. महानगरपालिकेतर्फे गेल्या महिन्यात ३६,५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात ३५१ संशयित रुग्ण आढळून आले असून त्यातील २२१ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शासनातर्फे राबवण्यात येणाऱ्या योजनेअंतर्गत शहरातील ३६,५०० घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. उर्वरित भागांतील घरांचे सर्वक्षण येत्या १५ ऑक्टोबर पर्यंत करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ७९४ कर्मचाऱ्यांची टीम सर्वेक्षणासाठी कार्यरत असून थर्मल स्कॅनर, ऑक्सिमीटर तसेच इतर सर्व उपकरणे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. शहरातील सिडको भागात दाट वस्ती असल्याने १२६ जणांची टीम याभागात सर्वेक्षण करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नाशिक रोड आणि सातपूर भागात अनुक्रमे ३ लाख १० हजार आणि ३ लाख ८ हजार लोकसंख्या असल्याने नाशिक रोड भागात ८१ कर्मचारी व सातपूर भागात ९८ कर्मचारी सर्वेक्षणाचे काम करत आहेत. जुने नाशिक तसेच पंचवटी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्याभागासाठी ७३ कर्मचाऱ्यांची टीम सर्वेक्षण करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.