धुळे – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत आतापर्यंत जिल्ह्यातील १४ लाख १ हजार ९७५ नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत ७१३ नागरिकांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिली आहे.
कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम १५ सप्टेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे ७०२ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके ६६८ गावांतील तीन लाख ४१ हजार ९१ घरांना भेट देवून १६ लाख ८५ हजार ८९ नागरिकांची तपासणी करणार आहेत. धुळे महानगरपालिकेच्या क्षेत्रात या मोहिमेंतर्गत ९५ आरोग्य पथकांद्वारे आतापर्यंत २ लाख ५१ हजार नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
धुळे तालुक्यात १६८, साक्री तालुक्यात २३०, शिरपूर तालुक्यात १६३, तर शिंदखेडा तालुक्यात १४१ आरोग्य पथके कार्यरत आहेत. या पथकांनी धुळे तालुक्यातील ३ लाख ६७ हजार ८१६, साक्री तालुक्यात ४ लाख ५६ हजार ८४३, शिरपूर तालुक्यात ३ लाख ३७ हजार ८७२, शिंदखेडा तालुक्यातील २ लाख ३९ हजार ४४४ नागरिकांची २९ सप्टेंबर २०२० अखेर आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आतापर्यंत धुळे जिल्ह्यातील ९२ टक्के नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
यादव यांनी सांगितले की, ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेत आतापर्यंत रक्तदाबाचे ८ हजार ४१७, कर्करोगाचे ३२२, मधुमेहाचे सात हजार ५६२, खोकला १ हजार २२३, तापाचे एक हजार २९३, श्वास घेण्यास त्रासाचे ७६, घसा दुखीचे ४६ रुग्ण आढळून आले आहेत. याशिवाय इतर आजारांचे ४३७५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७१३ रुग्णांना पुढील औषधोपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
आरोग्य तपासणीसाठी नियुक्त केलेले पथक दररोज किमान ५० घरांना भेट देत आहेत. पथकातील सदस्य संबंधित घरातील सदस्यांचे तापमान, ऑक्सिजन आणि कोमॉर्बिड रुग्ण आहेत का याची माहिती घेत आहेत. ताप, खोकला, दम लागणे, ऑक्सिजन कमी भरणे, अशी कोविड सदृश लक्षणे असणाऱ्या नागरिकांना जवळच्या फिव्हर क्लिनिक मध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात येत आहे. कोमॉर्बिड असणारे रुग्ण नियमित उपचार घेतात किंवा नाही याची खात्री आरोग्य पथकांच्या माध्यमातून करण्यात येत आहे, असे यादव यांनी सांगितले.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ ही मोहीम २५ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार आहे. यात पहिली फेरी १० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होईल. पहिल्या फेरीचा कालावधी १५ दिवसांचा असून दुसऱ्या फेरीचा कालावधी १० दिवसांचा आहे, असे यादव यांनी स्पष्ट केले आहे.