संगीता भास्कर कदम, नाशिक
…….
माझा नवरात्री उत्सव यावेळी मी वेगळ्या पध्दतीने साजरा केला. या दिवसात मी मी तीन विलक्षण पुस्तके वाचली. या पुस्तकांची नावे व त्याची माहिती सर्वांना मिळावी असे असं मनात आले. त्यानंतर काही तासातच यावर हा माहिती पर लेख लिहला.
– The last Girl : My story of captivity and my fight against the Islamic State.
– Not without my daughter
– Timepass
यातील दोन आणि तीन नंबरची पुस्तकं माझ्या बकेट लिस्ट मध्ये आधीच होती पण मागवू आज उद्या असं चालू होतं. फेसबूकच्या अक्षरधन ग्रुपवर विनीत वर्तक यांचा The last girl ची लेखिका नादिया मुराद वरील लेख वाचला आणि लगेच तिन्ही पुस्तकं ऑनलाईन ऑर्डर केली, आणि झपाटल्यासारखी वाचून काढली. हर्षल भानुशाली यांनी ती त्वरीत पाठवली, त्यांचे आभार. (विनीत सरांचा फार सुंदर लेख आहे आवर्जून वाचावा असा.)
पहिलं पुस्तकं The Last Girl नादिया मुराद या २७ वर्षाच्या मुलीचं. कोण ही नादिया मुराद ?
तिचा जन्म १९९३ चा. २०१४ पर्यन्त इराक मधील एका छोट्या गावात तिचं साधं सरळ आयुष्य सुरु होतं. आणि अचानक एके दिवशी ISIS ( इस्लामिक स्टेट ) चा हल्ला झाला. सहा भाऊ आणि नंतर आई यांना मृत्युच्या कराल जबड्यात जाताना तिने पाहिले. ISIS च्या सैनिकांनी तिचा अनन्वित छळ केला. मारहाण, अंगभर सिगरेटचे चटके, शुद्ध हरपेपर्यंत बलात्कार, सामुहिक बलात्कार, पुन्हा पुन्हा. वाचताना अक्षरशः अंगभर शहारे येतात. नादिया म्हणते खुदाने तिला एक अगदी एकच इच्छा पूर्तीचं वचन दिलं तर ती असेल या पृथ्वीतलावरून आतंकवादाचं मूळ समूळ उच्चाटन. आतंकवाद्यांच्या अत्याचाराने नादिया घायाळ झाली, ती विव्हळ झाली, आक्रोश केला तिने जिवाच्या आकांताने. पण ती उभी राहीली ताठ कण्याने. नादिया लिहिते हे असले अमानुष अत्याचार सहन करणारी ती या भूतलावरील शेवटची मुलगी ठरावी. म्हणून तिचं हें The Last Girl. त्यांनी तिचं अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला. पण तिने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. २०१६ चा शांततेचा नोबेल पुरस्कार नादियाला विभागून देण्यात आला. सध्या ती जर्मनीत आहे. याझिदी स्त्रियांना त्यांचे मूलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी तिचा लढा चालू आहे. नादियाच्या या पुस्तकाने मला निःशब्द केलं, अंतर्मुख केलं. नादिया तुला माझा त्रिवार सलाम आणि तू करत असलेल्या कार्याला मनापासून शुभेच्छा.
दुसरं पुस्तक Not without my daughter. Betty Mahmoody हिचं आत्मकथन. मराठी उच्चार नक्की काय होतो हे माहीत नसल्याने नावं मी इंग्लिश मधेच लिहिली आहे. तर Betty ही अमेरिकन मुलगी. घटस्फोटीत, दोन मुलांची आई. Betty ने १९७७ मध्ये डॉक्टर सैय्यद Mahmoody या इराणी माणसाशी लग्नं केलं. या जोडप्याला Mahtob नावाची मुलगी झाली. १९८४ मध्ये Mahtob चार वर्षांची असतांना, सगळ्या नातेवाईकांना भेटायचं असं सांगून तिचा नवरा दोन आठवड्याच्या सुट्टीसाठी या दोघीना घेऊन इराणला आला. दोन आठवड्यांची सुट्टी संपली आणि तिला सांगण्यात आलं, Mahtob सह इथंच इराणमध्ये राहायचंय, मरेपर्यंत. पद्धतशीरपणे Betty ला सापळ्यात अडकवलं होतं. इराण ते पुन्हा मिशिगन गाठण्यासाठी तिला करावा लागला १८ महिन्यांचा अविरत संघर्ष. या कालावधीत नवऱ्याने आणि त्याच्या नातेवाईकांनी तिचा विविध मार्गानी छळ केला. अनेक निर्बंध तिच्यावर लादण्यात आले. तिला आणि तिच्या मुलीला अमानुषपणे मारण्यात आलं. जेव्हा बेट्टीचे वडील अमेरिकेत खूप आजारी होते. मरण्यापूर्वी वडिलांना तिला बघायचं तेव्हा तिला सांगण्यात आले, मुलीला इथेच राहू दे आणि तू अमेरिकेला जा. पण मुलीला घेऊनच जायचं हा तिचा ठाम निर्धार. त्यातूनच जन्माला आलं, हे Not without my daughter! या १८ महिन्यात बेट्टीने एक आई म्हणून केलेला संघर्ष, उपसलेले कष्टं, आणि तत्कालीन इराणी स्त्रियांची सामाजिक स्थिती, त्यांना मिळणारी अमानवीय वागणूक याचं चित्रण या पुस्तकात आहे. या पुस्तकाची इंग्लिश भाषा अगदी साधी सोपी आणि ओघवती असल्याने सलग वाचून पूर्ण करता आलं. काही अडलं तर google सर आहेतच मदतीला.
तिसरं पुस्तक टाईमपास प्रोतिमा बेदी यांच्या आठवणी. पूजा बेदी त्याच्या मुलीने त्याचं संकलन केलंय. त्यांचं अपूर्ण राहिलेलं आत्मचरित्र, काही लेख, त्यांनी लिहिलेली काही पत्रं या सगळ्यांची गुंफण म्हणजे Timepass ! लहानपणीच तिच्या दिसण्यावरून तिच्यावर कुरुपतेचा शिक्का मारला घरच्यांनीच. ( होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक) काली म्हणून तिची हेटाळणी केली जायची. जेमतेम दहा वर्षांची असताना चुलत भावाने केलेला बलात्कार अनेकवेळा. कबीर बेदींशी झालेलं लग्नं जे अल्पकाळ टिकलं. पूजा आणि सिद्धार्थ ही दोन अपत्यं. प्रोतिमा बेदींचं आयुष्य वादग्रस्तच होतं. त्या म्हणतात, “आपल्या समाजाने अगदी काळजीपूर्वक केलेला प्रत्येक नियम मी मोडला. मी कसलीच बंधनं मानली नाहीत. मला जे जे करावंसं वाटलं, ते ते मी सपाटून केलं. “ टॉप मॉडेल ते संन्यासिनी असा टोकाचा विरोधाभास असलेलं आयुष्यं प्रोतिमा जगल्या. वयाच्या २६ व्या वर्षी ओडीसी नृत्य गुरुकुल पद्धतीने कटक मध्ये शिकल्या. प्रचंड मेहनतीने त्यात प्राविण्य मिळविले आणि जगभर ओडीसी नृत्याचे प्रयोग केले. तुमच्या नृत्यातून कालीमातेचा साक्षात्कार होतो असं लोक म्हणायचे. नाहीतरी लहानपणी काली म्हणून लोक हिणवायचे तिला. या नृत्य साधनेतून तिने एक सुंदर स्वप्नील आविष्कार साकारला. बेंगलोर जवळील नृत्यग्राम. भारतीय शास्त्रीय नृत्यं गुरुकुल पद्धतीने शिकवलं जाणारं पहिलं केंद्र. यासाठी त्यांनी जीवतोड मेहनत घेतली. पूजा बेदी म्हणते , माझी आई म्हणजे खळाळतं हास्य, अतिउत्कट भावना, न संपणारी ऊर्जा. प्रोतिमा बेदींचं संपूर्ण आयुष्यं वादात्मक आणि अपवादात्मक घटनांची शृंखला आहे . खूप कमी लोकांचं आयुष्य असं असतं.
ही तिन्ही पुस्तकं तिन स्त्रियांचे आत्मकथन आहे त्यांची आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक, शैक्षणिक पार्श्वभूमी, जीवनशैली पूर्णतः भिन्न. त्यांच्यातील समान दुवा हा की पूर्ण ताकदीने त्यांनी लढा दिला स्त्रीचं अस्तित्वं नाकारणाऱ्या पुरुष प्रधान समाज व्यवस्थेविरुद्ध !
सर्वात शेवटी हा लेख म्हणजे या पुस्तकांचं परीक्षण किंवा पुस्तक परिचय नाही, माझी तेवढी योग्यता आणि कुवतही नाही. तशी ही पुस्तकंही बरीच जुनी आहेत मी उशिरा वाचली. नवरात्रीत या पुस्तकांनी मला आदिशक्तीचा, स्त्रीच्या आदिमशक्तीचा जागर केल्याचा आनंद दिला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ३१ जानेवारी २०२० मध्ये घेतलेली स्वेच्छा निवृत्ती, त्यानंतर आलेलं lockdown, या मुळे मनावर आलेलं नैराश्याचं या पुस्तकांनी दूर केलं.ज्यांना या पुस्तकांची माहिती नसेल त्यांना माहिती व्हावी आणि त्यांनाही ही पुस्तकं विकत घेऊन वाचण्याची प्रेरणा मिळावी या साठीच हा लेखन प्रपंच.