नवी दिल्ली – संरक्षण दलातील व्यक्तींच्या मृत्युनंतर कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरण्यासाठी सध्याच्या तरतुदीनुसार त्या व्यक्तीची संरक्षण दलात ७ वर्षांची अखंडित सेवा पूर्ण झालेली असणे बंधनकारक होते.
वाढीव दराने सामान्य कुटुंब निवृत्ती वेतन शेवटच्या पगाराच्या ५० टक्के दराने मोजले जाते तर सामान्य कुटुंब निवृत्ती वेतन शेवटच्या पगाराच्या ३० टक्के दराने मोजले जाते. वाढीव दराने दिले जाणारे सामान्य कुटुंब निवृत्ती वेतन सेवेत असलेल्या व्यक्तीच्या मृत्युच्या तारखेपासून १० वर्षांसाठी दिले जाते. यात कमाल वयोमर्यादा विचारात घेतली जात नाही. सेवानिवृत्त झालेल्या, सेवेतून मुक्त झालेल्या, सेवेसाठी अपात्र ठरलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला वाढीव दराने दिले जाणारे सामान्य कुटुंब निवृत्ती वेतन व्यक्तीच्या मृत्युनंतर सात वर्षे किंवा वयाची ६७ वर्षे पूर्ण यापैकी जे आधी होत असेल त्या नियमाने दिली जाते.
मात्र ५ ऑक्टोबर २०२० ला प्रसिध्द झालेल्या सरकारी पत्रानुसार आता कुटुंब निवृत्ती वेतनासाठी पात्र ठरण्यासाठीची सात वर्षे अखंडित सेवेची अट १ ऑक्टोबर २०१९ पासून काढून टाकण्यात आली आहे.
तसेच १ ऑक्टोबर २०१९ आधीच्या १० वर्षांच्या कालावधीच्या आत जर संरक्षण दलातील व्यक्तीचा मृत्यू झाला असेल आणि त्या व्यक्तीने दलात सात वर्षे अखंडित सेवा पूर्ण केलेली नसेल तर अशा व्यक्तीचे कुटुंब देखील नव्या नियमानुसार १ ऑक्टोबर २०१९ पासून वाढीव दराने निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असेल.