१० वर्षांपेक्षा कमी सेवा करणाऱ्यांनाही मिळणार पेन्शन
नवी दिल्ली ः केंद्र सरकारने माजी सैनिकांबाबत मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार दहा वर्षांपेक्षा कमी सेवा बजावणाऱ्या सैनिकांना आता पेन्शन मिळू शकणार आहे. या निर्णयाचे माजी सैनिकांनी स्वागत केले आहे.
सरकारने १० वर्षांपेक्षा कमी सेवा पूर्ण करणाऱ्या सैन्यकर्मचाऱ्यांना देखील, आता निवृत्तीवेतनाचा (इनव्हॅलिड पेंन्शन) निव्रुत्तीवेतनाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या सैन्यकर्मचार्यांना अपंगत्व आले असून, अस्वास्थ्य अथवा असक्षमता (NANA) याकारणांमुळे ज्यांची सेवा थांबवण्यात येते, अशा सैन्यकर्मचाऱ्यांना विकलांगत्व (इव्हँलिडेटेड) निव्रुत्तीवेतन देण्यात येते.संरक्षणमंत्री श्री. राजनाथ सिंह यांनी या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. या निर्णयाचा लाभ ४ जानेवारी २०२० पासून अथवा यानंतर सेवेत रुजू झालेल्या सर्व सैन्यकर्मचार्यांना मिळेल.
याआधी, विकलांग निव्रुत्तीवेतनाचा लाभ कमीत कमी १० वर्षे अथवा त्यापेक्षा अधिक काळ सेवा बजाविणा-या कर्मचाऱ्यांना मिळत असे.यापूर्वी ज्यांची सेवा १० वर्षांपेक्षा कमी झाली आहे अशा सैन्यकर्मचाऱ्यांना केवळ ग्रँच्युईटीचा लाभ मिळत असे. या निर्णयामुळे ज्या सैन्यकर्मचार्यांची सेवा दहा वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी झाली आहे, परंतु जे सेवा बजाविण्यास शारीरिक अथवा मानसिक कारणामुळे असमर्थ आहेत तसेच जे कर्मचारी सैन्य अथवा नागरी सेवेत समाविष्ट होऊ शकत नाहीत अशा सैन्यकर्मचार्यांना याचा लाभ मिळेल आणि आर्थिकदृष्ट्या
त्यांचे जीवन सुसह्य होईल.