पिंपळगाव बसवंत – कोकण शिक्षक मतदार संघाचे माजी आमदार रामनाथ मोते (वय ६८) यांचे रविवारी निधन झाले.
त्यांच्या निधनाने शिक्षक वर्गातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
मोते यांनी हलाखीच्या परिस्थितीतून दिवस काढले होते. त्यांनी नोकरीच्या शोधात घर सोडले. प्रारंभी उल्हासनगरच्या सरस्वती विद्यालयात लिपिक म्हणून ते नोकरी करत होते. परीक्षा देऊन ते शिक्षक झाले. शिक्षक परिषदेच्या माध्यमातून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत सलग दोन वेळा ते विधान परिषदेत शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते. तिसऱ्या वेळेस संघटनेसोबत मतभेद झाल्याने त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली. पण पराभवानंतरही ते खचले नाहीत. शिक्षकांच्या प्रश्नांसाठी ते शिक्षण क्रांती संघटनेच्या माध्यमातून शेवटपर्यंत कार्यरत होते. किडनीच्या आजारामुळे ते अखेरच्या काळात त्रस्त होते. मूळचे नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी गावचे ते भूमिपुत्र होते. त्यांच्या निधनामुळे शिक्षण क्षेत्रासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.