नवी दिल्ली – माजी राष्ट्रपती आणि भारतरत्न प्रणव मुखर्जी (वय ८४) यांचे सोमवारी (३१ ऑगस्ट) निधन झाले. फुफ्फुसाचा संसर्ग झाल्याने त्यांची प्रकृती आणखी बिघडली होती. त्यांच्यावर सैन्य रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या दहा तारखेला मेंदूवर शस्त्रक्रिया झाल्यापासून मुखर्जी हे कोमात होते. कृत्रिम श्वसन यंत्रणेसह विशेषज्ज्ञ डॉक्टरांचं पथक त्यांच्यावर उपचार करत होते. मुखर्जी यांना कोरोना विषाणूचा संसर्गही झाला होता. पंतप्रधान, राष्ट्रपतींसह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
मुखर्जी यांचे देशाच्या वाटचालीत मोठे योगदान होते. अर्थमंत्री म्हणून त्यांने अनेक ठोस निर्णय घेतले. तसेच, सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदाचा मान त्यांनी वाढविला. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी देशाची सेवा केली.
दुखवटा जाहीर
मुखर्जी यांच्या निधनानंतर ३१ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर असा सात दिवसांचा शासकीय शोक देशभर पाळण्यात येणार आहे. देशभरातील इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाणार आहे. तसे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.