अहमदनगर – माजी खासदार पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील यांनी राजकारणाला समाजबदलाचे माध्यम मानून काम केले. त्यांनी ग्रामविकास, सहकार, सिंचन आणि शिक्षण क्षेत्रात मूलभूत काम केले आहे. सहकार चळवळीला त्यांनी वेगळा आयाम दिला, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केली तर स्वत:तील साधेपणा जपत परिस्थितीला सामोरे जाण्याचे धैर्य आणि ती बदलवण्याचा खंबीरपणा बाळासाहेब विखे पाटील यांनी दाखविला. पद्मश्री विठ्टलराव विखे पाटील यांनी दिलेला वारसा त्यांनी समर्थपणे सांभाळला आणि कष्टकरी, शेतकर्यांच्या मनात स्वताचं स्थान निर्मांण केले, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.
माजी खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी लिहिलेल्या राजहंस प्रकाशनच्या ‘देह वेचावा कारणी’ या आत्मचरित्राच्या प्रकाशन आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचा नामविस्तार समारंभ दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे हे मुंबईहून दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार हरिभाऊ बागडे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार आशुतोष काळे, आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे चेअरमन व कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र विखे आदी उपस्थित होते.
यावेळी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव त्यांच्या मनोगतातून केला. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रास्ताविकात आत्मचरित्र प्रकाशन आणि संस्था नामविस्ताराबाबत माहिती दिली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी मानले.