लखनऊ – भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे आज कोरोनाच्या संसर्गामुळे निधन झाले. चेतन चौहान यांचे बंधु पुष्पेंद्र चौहान यांनी याबाबत माहिती दिल्याचे वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. अनेक मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना येथील गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर प्रकृती अधिक खालावल्याने, त्यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात हलवण्यात आले होते. तिथेच आज (१६ ऑगस्ट) त्यांची प्राणज्योत मालवली. चौहान यांनी ४० कसोटी सामन्यात १६ अर्धशतकांसह २ हजार ८४ धावा केल्या. सात एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमधेही त्यांनी भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. १९८१ साली त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. उत्तर प्रदेशातील अमरोह मतदारसंघाचे खासदार म्हणून ते दोन वेळा निवडून आले होते. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारमध्ये ते क्रीडा आणि युवक कॅबिनेट मंत्री होते.