नवी दिल्ली – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते दिलीप गांधी यांचे आज पहाटे निधन झाले. दिल्लीतील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. ते ६९ वर्षांचे होते. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. दिलीप गांधी यांच्या पार्थिवावर दिल्लीतीच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या मृत्यूसमयी पत्नी, दोन्ही मुले दिल्लीतच होते.
दिलीप गांधी यांनी तीन वेळा दक्षिण मतदारसंघाचे लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दिल्लीत होते. आज त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा पसरली. दिलीप गांधी यांनी महाविद्यालयीन जीवनापासून भाजपच्या कामाला सुरुवात केली. पक्ष वाढविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्षपद, भारतीय जनता पार्टी अहमदनगर शहराध्यक्षपद आदी जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या. १९८५ ते १९९९ या कालावधीत महमदनगर नगरपालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले.